Pune Railway Station News : वंदे भारत एक्सप्रेस च्या अभूतपूर्व यशानंतर भारतीय रेल्वे लवकरच वंदे भारत स्लीपर ट्रेन आणि वंदे भारत मेट्रो ट्रेन रुळावर उतरवणार आहे. खरेतर, जेव्हापासून वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू झाली आहे तेव्हापासूनच ही ट्रेन चर्चेत आहेत. या भारतातील पहिल्या स्वदेशी हाय स्पीड ट्रेनमुळे प्रवाशांचा प्रवास हा खूपच जलद झाला आहे.
जलद सुरक्षित आणि आरामदायी प्रवासामुळे ही गाडी अल्पकालावधीतच प्रवाशांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. प्रवासी या ट्रेनचे तिकीट दर अधिक असतानाही या गाडीने प्रवास करण्यास पसंती दाखवतात.
यामुळे रेल्वे देखील वंदे भारत एक्सप्रेसचे जाळे विस्तारण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहे. आतापर्यंत देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर ही ट्रेन सुरू झाली आहे. मात्र सध्या फक्त चेअर कार प्रकारातील वंदे भारत एक्सप्रेस सुरू आहे.
दरम्यान पुणेकरांसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार चेअर कार वंदे भारत एक्सप्रेसच्या यशानंतर आता वंदे भारत स्लीपर ट्रेन आणि वंदे भारत मेट्रो ट्रेन लाँच केल्या जाणार आहेत.
पुण्याला लवकरच वंदे भारत मेट्रो अन वंदे भारत स्लीपर ट्रेनची देखील भेट मिळणार आहे. पुणे ते दिल्ली या मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे.
तसेच पुणे ते नाशिक, पुणे ते मुंबई पुणे ते सोलापूर आणि पुणे ते नागपूर या मार्गांवर वंदे भारत मेट्रो ट्रेन सुरू होणार अशी आशा व्यक्त केली जाऊ लागली आहे.
कारण की, यासाठी पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिल्ली दरबारी पाठपुरावा सुरू केला आहे. मोहोळ यांनी यासंदर्भात नुकतीच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आहे.
मोहोळ यांनी या बाबत केंद्रीय रेल्वेमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा केली असून केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन मोहोळ यांना दिले आहे.
यामुळे लवकरच पुण्याला वंदे भारत स्लीपर आणि वंदे भारत मेट्रो ट्रेनची भेट मिळणार असे बोलले जात आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आतापर्यंत पुण्याला एक वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळाली आहे.
मुंबई ते सोलापूर यादरम्यान चालवली जाणारी वंदे भारत एक्सप्रेस पुण्या मार्गे धावत आहे. परंतु पुणे रेल्वे स्थानकावरून अजून एकही वंदे भारत एक्सप्रेस सूरु झालेली नाही. मात्र भविष्यात पुणे रेल्वे स्थानकावरून वंदे भारत स्लीपर आणि वंदे मेट्रो सुरु होण्याची शक्यता आहे.