Pune Railway News : उन्हाळी सुट्ट्या पाहता सध्या देशभरात धावणाऱ्या अनेक गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. वाढत्या प्रवाशांचा ओघ पाहता रेल्वे प्रशासनाने देखील कंबर कसली असून प्रवाशांच्या सेवेसाठी काही उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यातील काही गाड्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीतून देखील चालवल्या जाणार आहेत.
राज्याची सांस्कृतिक राजधानी अर्थातच पुणे येथून पुणे-नागपूर-पुणे आणि पुणे-हजरत निजामुद्दीन-पुणे या उन्हाळी विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. यामुळे उन्हाळीच्या सुट्ट्यांमध्ये झालेली अतिरिक्त गर्दी नियंत्रणात येईल अशी आशा आहे. दरम्यान, आता आपण या दोन्ही गाड्यांचे वेळापत्रक थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं असेल पुणे-नागपूर विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक ?
पुणे-नागपूर दरम्यान द्वीसाप्ताहिक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. म्हणजेच पुणे ते नागपूर दरम्यान आणि नागपूर ते पुणे दरम्यान आठवड्यातून दोन दिवस उन्हाळी विशेष गाडी धावणार आहे. यामुळे पुणे ते नागपूर आणि नागपूर ते पुणे असा प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ते नागपूर विशेष गाडी ही 14 एप्रिल ते 16 जून या कालावधीत चालवली जाणार असून या कालावधीत ही गाडी मंगळवारी आणि रविवारी पुणे रेल्वे स्थानकावरून दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी रवाना होणार आहे आणि नागपूरला दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता पोहोचणार आहे.
तसेच नागपूर ते पुणे ही विशेष गाडी 13 एप्रिल ते 15 जून या कालावधीत प्रत्येक सोमवार आणि शनिवारी चालवली जाणार आहे. या दिवशी ही गाडी नागपूर रेल्वे स्थानकावरून सायंकाळी सात वाजून 40 मिनिटांनी सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
पुणे-नागपूर विशेष गाडीचे थांबे
मिळालेल्या माहितीनुसार पुण्याहून सुटणाऱ्या या विशेष गाडीला उरुळी, दौंड कार्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. पुणे ते नागपूर विशेष गाडीच्या 19 फेऱ्या आणि नागपूर ते पुणे विशेष गाडीचा 19 फेऱ्या अशा एकूण 38 फेऱ्या नियोजित आहेत.
पुणे-हजरत निजामुद्दीन-पुणे विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक
पुणे-हजरत निजामुद्दीन विशेष गाडी आठवड्यातून एक दिवस चालवली जाणार आहे. ही गाडी 12 एप्रिल ते 28 जून दरम्यान दर शुक्रवारी पुणे रेल्वे स्थानकावरून सायंकाळी साडेपाच वाजता सोडले जाणार आहे आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावर दुसऱ्या दिवशी सायंकाळी पावणे पाच वाजता पोहोचणार आहे.
तसेच हजरत निजामुद्दीन-पुणे विशेष गाडी 13 एप्रिल ते 29 जून दरम्यान दर शनिवारी हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावरून रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी रात्री अकरा वाजून 55 मिनिटांनी पुणे रेल्वे स्थानकावर येणार आहे.
पुणे-हजरत निजामुद्दीन विशेष गाडीचे थांबे
लोणावळा, कल्याण, वसई रोड, सुरत, बडोदा, रतलाम, भवानीमंडी, कोटा, सवाई माधोपुर आणि मथुरा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर पुणे-हजरत निजामुद्दीन विशेष गाडीला थांबा मंजूर करण्याचा निर्णय रेल्वेने घेतलेला आहे.
या गाडीच्या पुणे ते हजरत निजामुद्दीन आणि हजरत निजामुद्दीन ते पुणे अशा प्रत्येकी 12 फेऱ्या होणार आहेत. म्हणजेच या गाडीच्या एकूण 24 फेऱ्या होणार आहेत.