Pune Railway News : सध्या संपूर्ण देशभरात सणासुदीचा हंगाम सुरू आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी आपण साऱ्यांनी गणेशोत्सवाचा सण मोठ्या आनंदात साजरा केला आहे. आता येत्या काही दिवसात आपण सर्वजण नवरात्र उत्सवाचा सण मोठ्या आनंदात साजरा करणार आहोत. यावर्षी नवरात्र उत्सव 15 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे.
15 ऑक्टोबरला घटस्थापना असून याच दिवसापासून नवरात्र उत्सवाची सुरुवात होणार आहे. नवरात्र उत्सव हा 24 ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे. 24 ऑक्टोबरला विजयादशमी अर्थातच दसऱ्याचा सण साजरा केला जाणार आहे. या अशा सणासुदीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
अशातच मात्र रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. मध्य रेल्वेने नागपूर विभागात काही तांत्रिक कामे हाती घेतली आहेत. नागपूर विभागातील राजनांदगाव ते कळमना दरम्यान ही तांत्रिक कामे केली जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, इथं तिसऱ्या मार्गाच्या इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगची कामे केली जाणार आहेत.
यामुळे मात्र 15 ऑक्टोबर पर्यंत काही रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये पुण्यातून धावणाऱ्या रेल्वे गाडीचा देखील समावेश आहे. ही कामे सात ऑक्टोबर पासून सुरू झाली असून 15 ऑक्टोबर पर्यंत या कामाच्या पार्श्वभूमीवर विविध रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. यात भुसावळ विभागातून जाणाऱ्या चार रेल्वे गाड्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत.
कोणत्या गाड्या रद्द केल्या आहेत?
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार भुसावळ विभागातील 12 ऑक्टोबर रोजी सुटणारी बिलासपूर-पुणे एक्स्प्रेस (गाडी क्र. १२८४९) रद्द करण्यात आली आहे.
13 ऑक्टोबर रोजी सुटणारी पुणे-बिलासपूर एक्स्प्रेस (गाडी क्र. १२८५०) देखील या कामाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने रद्द केली आहे.
पोरबंदर-संत्रागाची एक्स्प्रेस (गाडी क्र. १२९४९) ही १३ ऑक्टोबर रोजी सुटणारी रेल्वे गाडी रद्द करण्यात आली आहे.
या कामाच्या पार्श्वभूमीवर 15 ऑक्टोबर रोजी अर्थातच घटस्थापनेच्या दिवशी सुटणारी संत्रागाची-पोरबंदर एक्स्प्रेस (गाडी क्र. १२९५०) देखील रद्द करण्यात आली आहे.