Pune Railway News : पुणे, सोलापूरसह मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी बातमी आहे. ती म्हणजे मध्य रेल्वेने अतिरिक्त गर्दी लक्षात घेता पुण्याहून एक नवीन रेल्वे गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. खरंतर राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याला ओळखले जाते. यासोबतच पुणे शहर शिक्षणाचे माहेरघर म्हणून जगात ख्यातीप्राप्त आहे.
येथे शिक्षण घेण्यासाठी देशभरातील विद्यार्थी स्थायिक झाले आहेत. अलीकडे पुण्यात विविध आयटी कंपन्यांनी देखील आपले बस्तान बसवले आहे. यामुळे पुणे शहरात शिक्षणानिमित्त, कामानिमित्त आणि स्पर्धा परीक्षाची तयारी करण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांची संख्या खूप अधिक आहे. यामध्ये मराठवाड्यातूनही मोठ्या प्रमाणात नागरिक पुण्यात दाखल होतात.
मराठवाड्यातून दररोज पुण्याला ये-जा करणाऱ्यांची संख्या खूप अधिक आहे. हेच कारण आहे की आता मध्य रेल्वेने मराठवाड्यातील नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातून मराठवाड्यात ये-जा करणाऱ्यांची संख्या वाढणार असल्याने मध्य रेल्वेने पुणे ते लातूर दरम्यान विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे ते हरंगुळ (लातूर) दरम्यान 10 ऑक्टोबर पासून ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत ही विशेष गाडी चालवली जाणार आहे. खरंतर पुणे ते लातूर दरम्यान दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र प्रवाशांची संख्या जास्त असली तरी देखील या मार्गावरील गाड्यांची संख्या ही खूप कमी आहे. हेच कारण आहे की पुणे रेल्वे विभागाने रेल्वे बोर्डाकडे या मार्गावर नवीन गाडी सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला होता.
दरम्यान पुणे रेल्वे विभागाचा हा पाठपुरावा यशस्वी झाला असून रेल्वे बोर्डाने आता पुणे ते हरंगुळ दरम्यान नवीन रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. आता आपण या गाडीचे वेळापत्रक आणि ही गाडी कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार याबाबत माहिती जाणून घेऊया.
कसं असेल वेळापत्रक?
ही विशेष रेल्वे गाडी पुणे रेल्वे स्थानकावरून सकाळी 6:10 वाजता हरंगुळकडे रवाना होईल आणि दुपारी 12:50 वाजता हरंगुळ रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर ही गाडी हरंगुळ येथून दुपारी तीन वाजता रवाना होईल आणि ही गाडी पुण्यात रात्री नऊ वाजता पोहोचणार आहे.
कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार?
मध्य रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ही गाडी हडपसर, उरुळी, केडगाव, दौंड, जेऊर, कुर्डूवाडी, बार्शी टाऊन आणि धाराशिव या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.