Pune Railway News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये नागरिकांचा प्रवास गतिमान व्हावा यासाठी मेट्रोचे जाळे विकसित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत शहरात दोन महत्त्वाच्या मार्गांवर मेट्रो सुरू झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रुबी हॉल क्लिनिक या विस्तारित मेट्रो मार्गांवर मेट्रो धावू लागली आहे.
एक ऑगस्ट 2023 पासून या मार्गांवर मेट्रो सुरु झाली असून शहरातील प्रवाशांनी या मेट्रोला मोठी पसंती दाखवली आहे. या मेट्रोतून दिवसाकाठी जवळपास 65,000 पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. यामुळे निश्चितच शहरातील नागरिकांचा प्रवास गतिमान झाला आहे यात शंकाच नाही.
अनेक नागरिकांनी आता खाजगी वाहनांचा वापर करण्याऐवजी मेट्रोने प्रवास करण्यास पसंती दाखवली आहे. निश्चितच पुण्यात सुरू झालेली मेट्रो शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी मोठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे यात शंकाच नाही. मात्र असे असले तरी पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचा रेल्वेमार्ग तब्बल 25 वर्षांपासून रखडला आहे.
अजूनही हा रेल्वे मार्ग पूर्णपणे बांधून तयार झालेला नाही. हा रेल्वे मार्ग आहे बारामती फलटण लोणंद रेल्वे मार्ग. मिळालेल्या माहितीनुसार या रेल्वे मार्गांना सन 1997-98 मधील अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली होती. मात्र या रेल्वे मार्गासाठी तब्बल वीस वर्षांचा काळ हा भूसंपादनासाठी खर्च झाला. या रेल्वे मार्गांपैकी फलटण ते लोणंद या मार्गाचे भूसंपादन पूर्ण झाले असून तेथे रेल्वे मार्ग देखील तयार झाला आहे.
पण बारामती ते फलटण दरम्यानचे काम रखडले आहे. आतापर्यंत बारामती ते फलटणदरम्यानच्या भूसंपादनाचे 78% काम पूर्ण झाले आहे. अशातच आता या मार्गाचे उर्वरित भूसंपादन लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनान्या दिल्या आहेत. रेल्वेने या रेल्वे मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी कंबर कसली असून या रेल्वे मार्गाचे काम सुरू झाले आहे.
या रेल्वे मार्गासाठी तीनशे कोटी रुपयांच्या दोन अशा 600 कोटी रुपयांच्या निविदा देखील प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. यामुळे आता या रेल्वे मार्गाचा राहिलेला भाग देखील लवकरच पूर्ण होईल असा आशावाद आता व्यक्त होऊ लागला आहे. येत्या दोन वर्षात म्हणजेच डिसेंबर 2025 पर्यंत या मार्गाचे काम पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे.
कसा असणार मार्ग?
बारामती ते फलटण हा 37 किलोमीटर लांबीचा मार्ग राहणार आहे. या मार्गात 4 मोठे पूल, 26 मेजर पूल, 23 मायनर फुल, सात आरओबी विकसित केले जाणार आहेत. निरा व कऱ्हा नदी, निरा डावा कालवा या ठिकाणी पुल उभारले जाणार आहेत. नवीन बारामती, माळवाडी व ढाकाळे ही तीन रेल्वे स्थानके देखील विकसित केली जाणार आहेत.
पहिल्या टप्प्यात एकेरी रेल्वे मार्ग विकसित होणार आहे. हा मार्ग विद्युतीकरणासह सुरू केला जाईल. यासाठी दोन टप्प्यात 600 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. एकंदरीत गेल्या अडीच दशकांपासून रखडलेला हा रेल्वे मार्ग आता प्रत्यक्षात उतरणार असे चित्र तयार होत आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये मोठे समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.