Pune Railway News : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुण्यातून एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार असून ही गाडी राज्यातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर तांबा घेणार आहे. उत्तर प्रदेश येथील प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी या विशेष गाडीचे आयोजन करण्यात आले आहे.
कुंभमेळ्याला उद्यापासून अर्थातच 13 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. 13 जानेवारीपासून सुरू होणारा हा कुंभमेळा जवळपास 44 दिवस सुरू राहील आणि या कुंभमेळ्यासाठी संपूर्ण देशभरातील आणि जगभरातील भाविक श्रीक्षेत्र प्रयाग राज या ठिकाणी एकवटणार आहेत.
दरम्यान जर तुम्ही ही पुण्याहून प्रयागराज या ठिकाणी जाऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची आहे. कुंभमेळायला जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून भारत गौरव ट्रेन चालवली जाणार आहे.
ही ट्रेन पुणे रेल्वे स्थानकावरून सुटेल अन उत्तर महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांमार्गे प्रयागराजला पोहोचेल, यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
आता आपण या गाडीचे वेळापत्रक, या गाडीला कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा मिळणार, याचे तिकीट दर नेमके कसे राहणार याबाबत जाणून घेणार आहोत.
वेळापत्रक, थांबे अन तिकीट दर
रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार भारत गौरव रेल्वेगाडी 15 जानेवारी 2025 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास पुण्यातून प्रयागराजसाठी निघणार आहे. ही ट्रेन पुणे, लोणावळा, कर्जत, पनवेल, कल्याण, नाशिक, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, वाराणसी आणि अयोध्या या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेत प्रयागराजला पोहोचेल.
अर्थातच ही गाडी उत्तर महाराष्ट्रातुन धावणार असून यामुळे उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना देखील प्रयागराजला जाणे सोयीचे होणार आहे. या गाडीमध्ये एकूण 750 प्रवासी बसू शकतात. आता आपण या गाडीचे तिकीट दर थोडक्यात जाणून घेऊयात.
रेल्वेने सांगितल्याप्रमाणे, या भारत गौरव ट्रेनचे इकॉनॉमी क्लास (स्लीपर) तिकीट 22,940 रुपये आहे. 3AC तिकीट 32,440 रुपये आहे आणि कम्फर्ट क्लास 2AC तिकिटाची किंमत 40,130 रुपये एवढी आहे.