Pune Railway News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुधारण्याकडे शासनाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे. याचा परिणाम म्हणून आता देशभरातील रस्ते आणि रेल्वे वाहतूक आधीच्या तुलनेत अधिक मजबूत झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र असे असले तरी अजूनही महाराष्ट्रात असे काही रेल्वे प्रकल्प आहेत जे की गेल्या एक-दोन दशकांपासून रखडलेले आहेत.
यात फलटण ते बारामती दरम्यानच्या रेल्वे मार्गाचा देखील समावेश होतो. हा रेल्वे प्रकल्प तब्बल 28 वर्षांपासून म्हणजेच जवळपास तीन दशकांपासून रखडलेला आहे. एकीकडे प्रवाशांचा प्रवास जलद व्हावा यासाठी वंदे भारत एक्सप्रेस सारख्या हायस्पीड ट्रेन सुरू केल्या जात आहेत तर दुसरीकडे असेही काही प्रकल्प आहेत जे की वर्षानुवर्ष रखडलेले आहेत.
आता मात्र फलटण ते बारामती दरम्यानच्या रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. कारण की या रेल्वे मार्गाचे भूमिपूजन मंगळवारी अर्थातच 12 मार्च 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले आहे.
या रेल्वे मार्गाचे भूमिपूजन पंतप्रधान महोदय यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पूर्ण केले असून लवकरच या मार्गाच्या कामाला आता लवकरच सुरुवात होईल अशी आशा व्यक्त होत आहे.
अशा परिस्थितीत, आता आपण हा रेल्वे मार्ग प्रकल्प नेमका कसा असेल, या रेल्वे मार्गात कोणते स्टेशन तयार होतील याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
कसा आहे हा रेल्वे मार्ग
या प्रकल्पासाठी चे भूसंपादन जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. हा रेल्वे मार्ग प्रकल्प अर्थातच बारामती-फलटण-लोणंद रेल्वे मार्ग एकूण 63.65 किलोमीटर लांबीचा आहे. या रेल्वे मार्गातील ३७.२० किलोमीटर लांबीचा टप्पा हा एकट्या बारामती तालुक्यातून जातो.
तालुक्यातील लट्टे, माळवाडी, कुरणेवाडी, खामगलवाडी, बऱ्हाणपूर, नेटपतवळण, सोनकसवाडी, ढाकळे, थोपटेवाडी, कर्हवागज, सावंतवाडी आणि तांदुळवाडी या गावांमधून हा मार्ग जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या रेल्वेमार्गात चार मोठे पूल, 26 मेजर पूल, 23 मायनर पूल व 7 आरओबी विकसित केले जाणार आहेत.
नीरा व कऱ्हा नदी, नीरा डावा कालव्यावर पूल उभारले जातील. या प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यात एकेरी रेल्वेमार्ग टाकला जाईल आणि तो विद्युतीकरणासह सुरू होणार आहे.
कोणते स्टेशन्स राहणार
या रेल्वेमार्गामुळे प्रवाशांचा प्रवास गतिमान होणार आहे. या रेल्वे मार्गामुळे बंगळुरू मार्गावर जाणे सोयीचे होणार आहे. प्रवाशांचा जवळपास 62 किलोमीटरचा फेरा यामुळे वाचणार आहे.
या नव्या रेल्वे मार्गावर न्यू बारामती, माळवाडी व ढाकाळे ही तीन रेल्वे स्थानके नव्याने विकसित केली जाणार असून यामुळे या परिसरातील विकास सुनिश्चित होणार आहे.