Pune Railway News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. ही अपडेट पुणे शहरातील रेल्वे प्रवाशांसाठी विशेष खास राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता पुण्यातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास गतिमान होणार आहे.
पुणे ते दौंड या मार्गावरचा प्रवास आता जलद होणार असून याबाबतचा निर्णय नुकताच रेल्वेच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की पुणे ते दौंड या रेल्वे मार्गाचे गेल्या काही दिवसांपासून काम केले जात होते.
या मार्गातील रेल्वेच्या रुळांची क्षमता वाढवण्याचे काम सुरू होते. आता हे काम पूर्ण झाले असून या मार्गावरील तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. यामुळे आता रेल्वे मंडळाने पुणे ते दौंड दरम्यान 130 किलोमीटर प्रति तास या वेगाने रेल्वे चालवण्यास नुकतीच परवानगी दिली आहे.
यामुळे आता या मार्गावरील प्रवास गतिमान होण्यास मदत मिळणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवासाच्या वेळेत जवळपास दहा मिनिटांची बचत होणार असा दावा केला जात आहे.
मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक नरेश ललवानी यांनी या मार्गावर 130 किलोमीटर प्रति तास या वेगाने रेल्वे धावण्यास परवानगी दिली आहे. याबाबतचे आदेशही ललवानी यांनी काढले आहेत. विशेष बाब अशी की याची अंमलबजावणी उद्यापासून अर्थातच 28 ऑगस्ट 2023 पासून सुरू होणार आहे.
तसेच मध्य रेल्वेने घेतलेला हा निर्णय सर्व प्रवासी गाड्यांना लागू राहणार आहे. म्हणजेच पुणे ते दौंड दरम्यान धावणाऱ्या सर्वच प्रवासी गाड्या आता 130 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावण्यात सक्षम राहणार आहेत.
पुणे ते दौंड दरम्यान सुरू होणार लोकल !
सध्या पुणे ते दौंड दरम्यान मेमू ट्रेन धावत आहेत. मात्र या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास गतिमान करण्यासाठी आता पुणे ते दौंड दरम्यान लोकल ट्रेन चालवली जाणार अशी माहिती देण्यात आली आहे. यासाठी रेल्वेच्या पुणे विभागाला मुंबईवरून इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.