Pune Railway News : पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आहे. गेल्या काही दशकात या सांस्कृतिक राजधानीला मात्र माहिती तंत्रज्ञानाचे हब म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पुण्यात आता मोठमोठ्या आयटी कंपन्यांनी आपले बस्तान बसवले आहे.
यामुळे पुण्यात कामानिमित्त राज्यभरातून तरुण वर्ग एकवटू लागला आहे. हेच कारण आहे की पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शहराला राज्यातील इतर महत्त्वाच्या शहरांशी कनेक्ट करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर शहरात पुणे ते नाशिक दरम्यान सेमी हाय स्पीड रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. अशातच आता पुणेकरांसाठी आणखी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ही बातमी पुणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खूपच महत्त्वाची राहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील गेल्या 25 वर्षांपासून रखडलेला रेल्वे मार्ग आता लवकरच पूर्ण होणार आहे. यासाठी 600 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून येत्या दोन वर्षात हा नव्याने प्रस्तावित करण्यात आलेला रेल्वे मार्ग पूर्ण करण्याचे टार्गेट रेल्वेने ठेवले आहे.
कसा आहे मार्ग?
बारामती-फलटण-लोणंद असा हा मार्ग राहणार आहे. खरंतर या मार्गाला 1997-98 साली झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली आहे. पण तेव्हापासून आतापर्यंत या रेल्वे मार्गाचा फक्त फलटण ते लोणंद हा टप्पा पूर्ण झाला आहे. भूसंपादनासाठी आलेल्या वेगवेगळ्या अडचणींमुळे आतापर्यंत फक्त फलटण ते लोणंद यादरम्यान रेल्वे मार्ग विकसित झाला आहे.
या रेल्वे मार्गाचा बारामती ते फलटण हा भाग अजूनही अपूर्णच आहे. दरम्यान या राहिलेल्या कामासाठी आता 600 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मार्गाचे आत्तापर्यंत 78% भूसंपादन झाले असून लवकरच उर्वरित भूसंपादन पूर्ण केले जाणार आहे.
तसेच येत्या दोन वर्षात या मार्गाचे काम पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. बारामती ते फलटण हा 37 किलोमीटरचा रेल्वे मार्ग असेल आणि या मार्गात 26 मेजर पूल विकसित केले जाणार आहेत. तसेच या मार्गावर 23 मायनर पूल आणि 7 आरओबी विकसित केले जाणार आहेत.
या रेल्वे मार्गांवर न्यू बारामती, माळवाडी आणि ढाकाळे ही नवीन रेल्वे स्थानके विकसित होणार आहेत. यामुळे या भागातील विकासाला मोठा हातभार लागणार आहे. या परिसरातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास देखील यामुळे गतिमान होणार आहे.