Pune Onion Rate : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कांद्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. खरंतर, लोकसभा निवडणुकीच्या आधी कांद्याला खूपच कवडीमोल दर मिळत होता. पण निवडणुकीनंतर कांद्याला चांगला समाधानकारक दर मिळतोय. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नाफेड लवकरच स्टॉक मधील कांदा बाजारात उतरवणार अशा चर्चा सुरू आहेत.
यामुळे आगामी काळात कांद्याचे दर पडतील असे म्हटले जात आहे. खरे तर, नाफेड बफर स्टॉक मधील कांदा बाजारात उतरवणार आहे. मात्र हा कांदा बैलपोळ्यानंतरच बाजारात येईल अशी माहिती नाफेडच्या अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे.
साधारणतः 10 ते 11 सप्टेंबर दरम्यान नाफेडचा कांदा बाजारात येऊ शकतो. तसेच नाफेडचा कांदा बाजारात आला तरीही कांद्याचे बाजार भाव फार पडणार नाही असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे.
याचे कारण म्हणजे दरवर्षी कर्नाटकचा लाल कांदा ऑगस्ट अखेरपर्यंत बाजारात येत असतो. यंदा मात्र हा कांदा अजून कुठेचं चमकत नाहीये. हवामान बदलामुळे कर्नाटकातील लाल वेल्लोर कांद्याचे उत्पादन देखील कमी झाले असावे असा अंदाज आहे.
तसेच आता कांद्याची निर्यात देखील वाढली आहे. विशेष म्हणजे नाफेड बफर स्टॉक मधील कांदा बाजारात उतरवणार असला तरी देखील याचे प्रमाण फारच कमी राहील असा अंदाज आहे.
नाफेड दररोज नाशिक जिल्ह्यातून जेवढा कांदा खरेदी करत आहे त्यापैकी फक्त दहा ते बारा टक्के कांदा दररोज बाजारात उतरवणार आहे. या सर्व गोष्टी विचारात घेतल्या तर नाफेडचा कांदा बाजारात दाखल झाल्यानंतरही कांद्याला 2500 ते 2700 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळू शकतो.
दरम्यान, नाफेडचा कांदा बाजारात येणार अशा या चर्चा सुरू असतानाचं पुण्यातील बाजारात कांद्याला विक्रमी दर मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज पुणे मांजरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला कमाल 4800 रुपये प्रति क्विंटाल असा विक्रमी दर मिळाला आहे.
या बाजारात आज 120 क्विंटल कांद्याची आवक झाली होती. आजच्या या लिलावात कांद्याला किमान 3000, कमाल 4800 आणि सरासरी 4500 रुपये भाव मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
विशेष म्हणजे आज हिंगणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला कमाल पाच हजाराचा भाव मिळाला आहे. या मार्केटमध्ये सरासरी भावही 4300 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास नमूद करण्यात आला आहे.