Pune News : कोकण आणि पुण्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. एस टी महामंडळाने पुण्याहून रत्नागिरी साठी एक नवीन बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे पुण्याहून कोकणात प्रवास करणाऱ्या असंख्य प्रवाशांना दिलासा मिळेल असे बोलले जात आहे.
रत्नागिरी ते पुणे व्हाया चिपळूण अशी शिवशाही रातराणी गाडी एक ऑक्टोबर पासून सुरू करण्यात आली आहे. संगमेश्वर, सावर्डे, चिपळूण येथील नागरिकांच्या माध्यमातून गेल्या अडीच दशकांपासून चिपळूण व्हाया रत्नागिरी ते पुणे अशी बस सेवा सुरू झाली पाहिजे अशी मागणी केली जात होती.
आता या भागातील प्रवाशांची मागणी एसटी महामंडळाने पूर्ण केली आहे. या मार्गावर रातराणी शिवशाही बस अखेरकार सुरु झाली आहे. तब्बल 25 वर्षांपासून ची मागणी पूर्ण झाली असल्याने या भागातील प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे.
एस टी महामंडळाच्या या निर्णयामुळे या भागातील प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. खरंतर एसटी तर्फे मागे एक सर्वे करण्यात आला होता. यामध्ये पुणे ते रत्नागिरी हा एक गोल्डन रूट असल्याचे स्पष्ट झाले होते. म्हणजेच या मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक असल्याचे या सर्वे मधून उघड झाले होते.
यामुळे या मार्गावर एसटीची बस सेवा सुरू झाली पाहिजे अशी मागणी होती. महत्त्वाचे म्हणजे या मार्गावर मोठ्या प्रमाणात खाजगी वाहने सुरु आहेत. मात्र असे असतानाही या मार्गावर एसटी महामंडळाकडून बस सेवा सुरू होत नव्हती.
पण सध्या चालू असलेल्या एसटी प्रवासी दिन माध्यमातून देवरूख येथील सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते यांनी केलेल्या आग्रही मागणीला रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा नियंत्रक बोरसे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या मार्गावर रातराणी शिवशाही गाडी सुरू करण्यात आली आहे.
एस टी महामंडळाची शिवशाही बस सुरू झाली असल्याने पुणे ते कोकण आणि कोकण ते पुणे हा प्रवास गतिमान होणार आहे. या अलीकडे सुरू झालेल्या रत्नागिरी पुणे रात्र आणि शिवशाही गाडीच्या वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर ही गाडी रत्नागिरीहून रात्री ८.३० वा., संगमेश्वरहून रात्री ९.४५ वा. आणि चिपळूणहून रात्री ११ वा. पुण्याला सोडली जाणार आहे.
दरम्यान प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन रत्नागिरी ते पुणे व्हाया चिपळूण अशी रातराणी शिवशाही बस सुरू करण्यात आली असल्याने प्रवाशांनी या गाडीला उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवावा, या गाडीने अधिका अधिक प्रवाशांनी प्रवास करावा असे आवाहन करण्यात आले आहे.