Pune News : पुणे जिल्हा हा पुणेरी पाट्यांसाठी संपूर्ण भारतात ओळखला जातो. याव्यतिरिक्त जिल्ह्यातील शेतीचे नाविन्यपूर्ण प्रयोग देखील कायमच चर्चेत राहतात. खरं पाहता शेतकरी बांधवांना गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे लागत आहे. यामुळे आता शेतकरी बांधव शेती नको रे बाबा असं म्हणू लागला आहे.
सातत्याने वाढणारे महागाई आणि त्यामुळे वाढणारा उत्पादन खर्च यामुळे पारंपारिक पिकपद्धतीतून शेतकऱ्यांना कवडीमोल उत्पन्न मिळत आहे. परिणामी शेतीचा व्यवसाय तोट्याचा बनला आहे. मात्र, काळाच्या ओघात शेतीमध्ये बदल करत फळबाग लागवडीकडे आपला मोर्चा वळवला तसेच हंगामी पिकांची शेती सुरू केली तर निश्चितच शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळू शकतं.
पुणे जिल्ह्यात बहुतांशी शेतकऱ्यांनी पारंपारिक पीक पद्धतीला बगल देत आधुनिक पद्धतीने बाजारात सदैव मागणीमध्ये असलेल्या पिकांची आणि फळबाग पिकांची लागवड सुरू केली आहे. बारामती तालुक्यातील शेतकरी बांधव देखील आता फळबाग लागवडीकडे वळू लागले आहेत. तालुक्यातील मौजे शिर्सुफळ येथील प्रयोगशील शेतकरी नितीन शरद पानसरे यांनी शेतीमध्ये केलेला भन्नाट प्रयोग सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
नितीन यांनी टरबूज, खरबूज आणि पपई पिकांच्या शेतीतून कमी जमिनीत लाखो रुपयांची कमाई केली आहे. विशेष म्हणजे नितीनने अवघ्या पाऊण एकरात दोन लाखांची कमाई केली आहे. पानसरे यांच्याकडे एकूण सहा एकर शेत जमीन आहे. यापैकी साडेपाच एकरावर शेती केली जाते तर उर्वरित अर्धा एकरावर शेततळे बनवण्यात आले आहे. पानसरे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत पिकांच्या पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर केला आहे.
नितीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात त्यांनी पपईची लागवड केली होती. या पपई पिकातून सध्या त्यांना उत्पादन मिळत असून किलोला 30 रुपये असा भाव मिळत आहे. पपई उत्पादन अजून सहा महिने सुरू राहणार आहे. म्हणजेच नितीन यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे. याबाबत नितीन पानसरे म्हणाले, कलिंगड, खरबूज हे आपण विक्रीही करतो. तीच फळे आपली मुलेही खात असतात. त्यामुळे फळांवर कमीत कमी केमिकलचा वापर केला जातो.
आम्ही शेती करताना सेंद्रिय पद्धतीने करण्यावर भर देतो. यामध्ये जास्तीत जास्त शेणखत, कोंबडीखत वापरतो. एकूण क्षेत्रापैकी अर्धा एकर क्षेत्रावर शेततळे आहे. दोन विहिरी आहेत. मात्र, तरीही ठिबक सिंचनाचा वापर करून पाणीबचतीवर भर दिला जात आहे. आम्ही पाच ते सहा शेतकरी एकत्रित सल्लामसलत करतो. गटशेतीद्वारे शेती करताना एकमेकांना भेडसावणाऱ्या अडचणींवर मात होण्यास मदत होते. एखाद्या पिकावर रोग पडला तर आम्हीच एकत्र येऊन त्यावर मार्ग काढतो.
या वेळी वेळ आणि पैशाचीही बचत होते आणि आमची एकी दिसून येते. माझा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. २०१५ सालापासून कलिंगड, खरबूज आणि पपईची शेती करण्यावर भर दिला आहे. या पिकांचा हंगाम संपल्यानंतर पुन्हा मका, भुईमूग, कांदा आणि बाजरीचे उत्पादन घेतो. साडेपाच एकर शेतीमध्ये वर्षभरात जवळपास दहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. कलिंगड, खरबुजाच्या विविध जातींची आतापर्यंत लागवड केली आहे.
दरवर्षी खरबूज आणि कलिंगडाच्या वेगळ्या जातीची लागवड करण्याचा प्रयोग करत आहोत. यापूर्वी पावसाळ्यामध्येही कलिंगडाचे उत्पादन घेतले होते. मात्र, पावसाळ्यात पिके जगवणे खूपच अवघड आणि जिकीरीचे काम आहे. यंदा ‘रसिका’ जातीच्या कलिंगडाची लागवड करणार असल्याचेही पानसरे यांनी सांगितले. त्यांना शेतीमध्ये वडील आणि पत्नीची मोलाची मदत होते.
आम्ही पाऊण एकर क्षेत्रामध्ये पपईची लागवड केली असून यंदा त्यातून तब्बल दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मात्र, ही शेती करताना जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर केला असून अत्यल्प प्रमाणात रासायनिक खते वापरली आहेत. नितीन शरद पानसरे, मु.पो. शिर्सुफळ, ता. बारामती, जि. पुणे