Pune News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मेट्रोमार्गासंदर्भात. मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात पुणेकरांसाठी विस्तारित मेट्रो मार्ग सुरु केले जाणार आहेत. विशेष बाब अशी की, या दोन विस्तारित मेट्रो मार्गांचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नियोजित करण्यात आले आहे. खरंतर पंतप्रधान एक ऑगस्टला पुण्यात येणार आहेत.
पंतप्रधानांचा एक ऑगस्ट रोजी पुणे दौरा आयोजित झाला असून यावेळी ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी येणार आहेत. या दौऱ्या दरम्यान नरेंद्र मोदी यांचे अनेक कार्यक्रम आहेत. यात फुगेवाडी ते शिवाजीनगर आणि गरवारे कॉलेज ते रुबी हॉल क्लिनिक या दोन विस्तारित मेट्रो मार्गांचे देखील लोकार्पण मोदी यांच्या हस्ते नियोजित करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.
याबाबत अधिकारीक माहिती हाती आलेली नाही मात्र फायनान्शिअल एक्सप्रेस या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. हे दोन विस्तारित मेट्रो मार्ग पूर्ण झाले असल्याचे महा मेट्रोकडून सरकारला कळविण्यात आले आहे. मात्र याच्या उद्घाटनाबाबत सरकारकडून अद्याप महा मेट्रोला सुचित करण्यात आलेले नाही. परंतु महा मेट्रोच्या काही अधिकाऱ्यांनी या दोन विस्तारित मेट्रो मार्गांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी एक ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर असल्याने त्यांच्या हस्ते होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला आहे.
दरम्यान या दोन विस्तारित मेट्रो मार्गाची अंतिम पाहणी नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे. शनिवारी रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी ही पाहणी पूर्ण केली आहे. तसेच या दोन्ही मेट्रो मार्गांवर मेट्रो धावण्यास आयुक्तांनी परवानगी दिल्याचे सांगितले जात आहे. आता महा मेट्रोच्या अधिकाऱ्यांना केवळ याबाबतचे प्रमाणपत्र अपेक्षित आहे. तसेच हे प्रमाणपत्र लवकरच दिले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
यामुळे हे दोन्ही मेट्रो मार्ग एक ऑगस्ट रोजी पीएम मोदी यांच्या हस्ते सुरू होतील अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पंतप्रधान महोदय यांनी पुणे शहरातील मेट्रोची पायाभरणी केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी 2022 मध्ये पिंपरीतील PCMC मुख्यालय ते फुगेवाडी आणि वनाझ ते गरवारे कॉलेजपर्यंतच्या दोन मार्गांचे उद्घाटनही केले आहे.
शिवाय आता फुगेवाडी ते शिवाजीनगर आणि गरवारे कॉलेज ते रुबी हॉल क्लिनिक दरम्यानच्या विस्तारित मेट्रो मार्गांना देखील त्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. निश्चितच हे दोन विस्तारित मेट्रो मार्ग सुरू झाले तर पुणेकरांचा प्रवास गतिमान होण्यास मदत मिळणार आहे. यामुळे सध्याच्या वाहतूक व्यवस्थेवरील ताण बऱ्याच अंशी कमी होण्यास मदत होणार आहे.