Pune News : महाराष्ट्रात प्रवासासाठी रेल्वेनंतर बसला सर्वात जास्त पसंती मिळते. राज्यात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या निश्चितच अधिक आहे. ज्या भागात रेल्वेची कनेक्टिव्हिटी नाही त्या ठिकाणी बसने प्रवास केला जातो.
दैनंदिन कामासाठी रेल्वे प्रमाणेच बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे. महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन अर्थातच एमएसआरटीसीच्या माध्यमातून राज्यात विविध मार्गांवर बस चालवल्या जात आहे.
शहरा-शहरांमधील दळणवळण व्यवस्था सुधारण्यासाठी एमएसआरटीसीने, एसटी महामंडळाने अलीकडे अनेक नवीन मार्गावर विना थांबा बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
अशातच आता पुणेकरांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे पुण्यातून उत्तर महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या शहरासाठी विना थांबा बस सेवा सुरू केली जाणार आहे.
खानदेश मधील धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील साक्री बस डेपोतून पुण्यासाठी विना थांबा बस सेवा चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साक्री आगाराचे पालक अधिकारी सौरभ देवरे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
देवरे यांनी साक्री ते पुणे दरम्यान विना थांबा बस सेवा सुरू होणार अशी माहिती दिली आहे. यामुळे साक्रीकरांचा पुण्याकडील प्रवास अधिक गतिमान आणि सुरक्षित होणार आहे.
वास्तविक पुणे ते साक्री आणि साक्री ते पुणे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. दैनंदिन कामानिमित्त साक्रीतून रोजाना शेकडो नागरिक पुण्याला जात असतात. म्हणून या मार्गावर विना थांबा बस सेवा सुरू करण्याची मागणी केली जात होती.
याच मागणीच्या पार्श्वभूमीवर परिवहन महामंडळाने ही बस सेवा चालवण्याचे जाहीर केले आहे. आता आपण या विना थांबा बस सेवेचे वेळापत्रक जाणून घेणार आहोत.
कसं असेल वेळापत्रक ?
परिवहन महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, साक्रीहून रोज रात्री 9 वाजता ही बस पुण्याच्या दिशेने रवाना होणार आहे आणि शिवाजीनगर पुणे येथे सकाळी सहा वाजता पोहोचणार आहे.
तसेच परतीच्या प्रवासात ही गाडी पुण्याहुन रोज रात्री दहाला साक्रीकडे रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही गाडी या मार्गावरील पिंपळनेर, चाकण, भोसरी, नाशिक फाटा व शिवाजीनगर या महत्त्वाच्या बस आगारात थांबा घेणार आहे.