Pune News : येत्या काही दिवसांनी दीपोत्सवाला सुरवात होणार आहे. दरम्यान याच दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर एस टी महामंडळाकडून अतिरिक्त गाड्या सुरू केल्या जात आहेत. दरवर्षी दिवाळीच्या काळात एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते.
यंदाही या काळात एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे आणि हीच संभाव्य अतिरिक्त गर्दी लक्षात घेता महामंडळाच्या माध्यमातून वेगवेगळ्या मार्गांवर विशेष बस गाड्या चालवल्या जात आहेत. या अतिरिक्त गाड्यांमुळे प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.
दरम्यान दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा एसटी आगारामार्फत दिनांक २५ ऑक्टोबर पासून लांजा ते पुणे स्वारगेट ही बससेवा सुरू करण्यात येणार असल्याची बातमी समोर आली आहे.
ही गाडी कायमस्वरूपी चालवली जाणार नसून फक्त दिवाळी सणासाठी ही गाडी सुरू केली जाणार आहे. खरेतर, रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील अनेक नागरिक पुणे आणि मुंबई येथे नोकरी करतात.
या नागरिकांना मुंबईहून लांजाला ये-जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कनेक्टिव्हिटी आहे. मात्र पुणे येथे जाण्यासाठी लांजा येथून थेट एसटी बस उपलब्ध नसल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे.
हीचं बाब लक्षात घेता, आता लांजा आगार व्यवस्थापक काव्या पेडणेकर यांनी खास दिवाळी सणाचे निमित्ताने लांजा-पुणे स्वारगेट ही बससेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
दिनांक २५ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत ही बससेवा सुरू राहणार आहे. लांजा बस स्थानकातून सकाळी ९ वाजता ही बस सोडली जाणार आहे.
तसेच परतीच्या प्रवासासाठी संध्याकाळी २१:३० वाजता ही गाडी सोडली जाणार आहे. या गाडीचे आरक्षण ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे या गाडीचा लांजा तालुक्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.