Pune News : राज्यातील तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ज्या तरुणांना पुण्यात नोकरी करण्याची इच्छा असेल अशा तरुणांसाठी ही एक मोठी खुशखबर राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे महापालिकेत लवकरच एक मोठी पदभरती आयोजित होणार आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की, महापालिकेच्या तिसऱ्या टप्प्यातील पदभरती संदर्भात हालचाली गतीमान झाल्या आहेत.
लवकरच पुणे महापालिकेत एकूण 340 विविध पदाच्या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव देखील तयार झाला आहे. या तिसऱ्या टप्प्यातील पदभरती संदर्भातील प्रस्ताव महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी स्थायी समिती पुढे मांडला आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी काही मीडिया रिपोर्ट्स मध्ये मुंबई महापालिकेत देखील पुढल्या महिन्यात 1100 लिपिक पदाच्या भरतीसाठी भरती प्रक्रिया आयोजित होणार असल्याची माहिती देण्यात आली होती.
मुंबई महापालिकेत होणारी ही भरती आयबीपीएस आणि आणखी एका संस्थेच्या माध्यमातून राबवली जाणार आहे. दरम्यान आता पुणे महापालिकेत देखील लवकरच ही भरती प्रक्रिया सूरु होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे पुणे महापालिकेत होणारी ही भरती आयबीपीएस या संस्थेच्या माध्यमातूनच आयोजित होणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. गेल्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातही याच संस्थेच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया आयोजित झाली होती.
गेल्या वर्षी 448 पदांची भरती प्रक्रिया पुणे महापालिकेत यशस्वीरित्या संपादित झाल्यानंतर पुणे महापालिकेच्या काही विभागातील प्रामुख्याने अग्निशामक दल आणि आरोग्य विभागाच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करणार असल्याची घोषणा महापालिका आयुक्त यांनी केली होती. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली यासाठी रोस्टर तपासणी करण्यात आली. या रोस्टर तपासणीसाठी आस्थापना विभागाचे उपायुक्त सचिन इथापे आणि त्यांच्या सहकार्यांचीं निवड झाली होती.
या पार्श्वभूमीवर तब्बल 340 पदांच्या भरतीसाठीचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी महापालिका आयुक्तांकडे दिला होता. हा प्रस्ताव महापालिका आयुक्तांनी आता स्थायी समिती पुढे ठेवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्थायी समितीमध्ये हा प्रस्ताव पास झाल्यानंतर लवकरच आयबीपीएस या संस्थेमार्फत पद भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
एका मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार या प्रस्तावामध्ये क्ष किरण तज्ञ (८), वैद्यकीय अधिकारी (२०), उप संचालक, प्राणी संग्रहालय (१), पशु वैद्यकीय अधिकारी (२), वरिष्ठ आरोग्य निरीक्षक (२०), कनिष्ठ अभियंता, विद्युत (१०), आरोग्य निरीक्षक (४०), वाहन निरीक्षक (३), औषध निर्माता (१५), पशुधन पर्यवेक्षक (१), अग्निशामक दल, फायरमन (२००) अशा एकूण 340 पदांसाठी भरतीची प्रक्रिया राबवण्यासाठी सुचित करण्यात आले आहे.
यामुळे आता लवकरच या पदभरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जाणार आहेत. तसेच या पदभरतीसाठी सामान्य ज्ञान, इंग्रजी, मराठी, बुद्धिमत्ता या विषयावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांची परीक्षा आयोजित होणार आहे. निश्चितच पुणे महापालिकेत नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमी राहणार आहे. आता या पदभरतीसाठी प्रत्यक्षात जाहिरात कधी निघते आणि संपूर्ण प्रक्रिया केव्हा सुरू होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.