Pune News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात खाजगी वाहनांचा वापर वाढला असल्याने प्रदूषणाचा स्तर विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. वाढते प्रदूषण सर्वांसाठीच चिंतेचा विषय ठरत आहे. यामुळे राज्यातील प्रदूषणाचा स्तर कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून राज्य परिवहन महामंडळाने इलेक्ट्रिक एसी शिवाई बस सुरू केल्या आहेत. राज्यातील बहुतेक विभागांमध्ये एसी इलेक्ट्रिक बस सेवा सुरू झाली आहे. दरम्यान आता पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एसी इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
स्वारगेट ते सोलापूर दरम्यान आज पासून अर्थातच 23 सप्टेंबर 2023 पासून इलेक्ट्रिक बस सेवा सुरू होणार आहे. आज पहिली ई बससेवा सुरू केली जाणार आहे. विशेष म्हणजे या मार्गावर सुरू होणारी इलेक्ट्रिक बस वातानुकूलित म्हणजे एसी बस राहणार आहे.
यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास जलद तर होणारच आहे शिवाय आरामदायी प्रवासाचा देखील आनंद प्रवाशांना घेता येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात स्वारगेट ते सोलापूर दरम्यान पाच इलेक्ट्रिक वातानुकूलित बस चालवल्या जाणार आहेत. यानंतर मग प्रवाशांचा प्रतिसाद पाहून या मार्गावर इलेक्ट्रिक वातानुकूलित बसची संख्या वाढवली जाणार आहे.
कसं राहणार वेळापत्रक
राज्य परिवहन महामंडळाकडून स्वारगेट ते सोलापूर दरम्यान आज पासून वातानुकूलित इलेक्ट्रिक शिवाई बस चालवली जाणार आहे. ही गाडी सोलापूरहून पहाटे पाच वाजता स्वारगेटकडे रवाना होणार आहे. तसेच स्वारगेट वरून पहाटे साडेपाच वाजता ही गाडी सोलापूरकडे रवाना होणार आहे.
सोलापूर येथून सकाळी पाच वाजेपासून ते नऊ वाजेपर्यंत आणि दुपारी चार वाजेपासून ते रात्री आठ वाजेपर्यंत ही गाडी दर एका तासाला स्वारगेट कडे रवाना होणार आहे. स्वारगेट येथून ही गाडी सकाळी साडेपाच वाजेपासून ते साडेनऊ वाजेपर्यंत आणि दुपारी साडेतीन वाजेपासून ते रात्री साडेसात वाजेपर्यंत दर एका तासाला सोलापूर कडे रवाना होणार आहे.
किती असेल तिकीट
या गाडीने प्रवास करण्यासाठी फुल तिकीट 545 रुपयाचे राहणार आहे. तसेच अर्धे तिकीट 285 रुपयाचे असेल. विशेष म्हणजे या गाडीने महिलांना 50 टक्के तिकीट दरात प्रवास करता येणार आहे तसेच 75 वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना या गाडीने मोफत प्रवास करता येणार आहे.