Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अन शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. पुण्यात असंख्य आयटी कंपन्या देखील आहेत. यामुळे देशातील कानाकोपऱ्यातील लोक पुण्यामध्ये येतात. हेच कारण आहे की, पुण्याला आता नवीन वर्षात पाच नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळू शकते असा दावा केला जात आहे.
भारतीय रेल्वेच्या माध्यमातून देशातील वंदे भारत एक्सप्रेसचे जाळे विस्तारले जात आहे. सध्या देशात 65 महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू आहे. महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्यातील 11 महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते मडगाव, सीएसएमटी ते जालना, नागपूर ते बिलासपुर, नागपूर ते सिकंदराबाद, नागपूर ते इंदोर, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर ही गाडी सुरू आहे.
पुण्याला आतापर्यंत तीन गाड्यांची भेट मिळालेली आहे. पुणे ते हुबळी आणि पुणे ते कोल्हापूर यासोबतच मुंबई येथील सीएसएमटी ते सोलापूर यादरम्यान धावणारी वंदे भारत ट्रेन देखील पुणे मार्गे सुरु आहे. विशेष म्हणजे नवीन वर्षात म्हणजेच 2025 मध्ये पुण्याला पाच नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळू शकतात.
मीडिया रिपोर्टनुसार पुणे ते शेगाव, पुणे ते बेळगाव, पुणे ते सिकंदराबाद, पुणे ते बडोदा आणि पुणे ते धुळे या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे. यातील पुणे ते धुळे या वंदे भारत एक्सप्रेस साठी धुळ्याच्या खासदार शोभा बच्छाव यांनी पाठपुरावा सुद्धा सुरू केला आहे.
खासदार महोदयांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची यासंदर्भात भेट घेतली होती. या भेटीदरम्यान खासदार महोदयांनी पुणे ते धुळे आणि मुंबई ते धुळे या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची आग्रही मागणी केली होती.
विशेष बाब अशी की रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नव्या वर्षात या संदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ अशी ग्वाही बच्छाव यांना दिलेली आहे. त्यामुळे नव्या वर्षात पुण्याला आणखी काही नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळण्याची शक्यता आहे. यामुळे पुण्यातील वंदे भारत एक्सप्रेसची संख्या वाढणार असून पुणेकरांचा प्रवास आणखी सुपरफास्ट होणार आहे.