Pune News : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांसाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना राबवल्या जातात. ज्या नागरिकांकडे स्वतःच्या हक्काचे घर नाही अशा नागरिकांना घर उपलब्ध व्हावे यासाठी घरकुल योजना देखील राबवल्या जात आहेत.
राज्यात अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांसाठी शबरी आवास योजना, अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांसाठी रमाई आवास योजना तसेच पंतप्रधान आवास योजनेसारख्या अनेक आवास योजना राबवल्या जात आहेत.
याशिवाय ओबीसी समाजातील नागरिकांसाठी देखील नवीन आवास योजना सुरू करण्यात आली आहे. याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे.
मोदी आवास योजना ही राज्यातील इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी प्रवर्गातील नागरिकांसाठी सुरू झालेली एक महत्त्वाची घरकुल योजना आहे.
दरम्यान याच घरकुल योजनेसंदर्भात एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी या घरकुल योजनेसाठी इच्छुक आणि पात्र लोकांना लवकरात लवकर अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे.
ज्या लोकांना स्वतःचे घर नाही अशा इतर मागासवर्गीय कुटुंबांना मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुल देण्यासाठी घरकुल मंजूर करण्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे.
अशा परिस्थितीत या योजनेसाठी पात्र नागरिकांनी अधिकाधिक अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आता आपण या योजनेसाठी कुठे अर्ज करावा लागणार या विषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
घरकुलासाठी कुठे करणार अर्ज
ओबीसी प्रवर्गातील ज्या नागरिकांकडे स्वतःचे हक्काचे पक्के घर नाही अशा नागरिकांना या योजनेअंतर्गत घरकुलासाठी अर्ज करता येणार आहे. अर्जदारांना त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा पंचायत समितीमध्ये या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे पक्के घर नसावे.
तसेच अर्जदाराकडे घरकुल मंजूर झाल्यास घर बांधण्यासाठी जागा असणे आवश्यक आहे. मोदी आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी फक्त ओबीसी आणि एसबीसी या संवर्गातील नागरिकांनाच अर्ज करता येणार आहे. ज्या नागरिकांना याआधी कधीच घरकुलाचा लाभ मिळालेला नाही त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
पुणे जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी मोदी आवास योजने अंतर्गत पंचायत किंवा पंचायत समितीमध्ये अर्ज केल्यानंतर त्या अर्जाची पोच [email protected] या ईमेल आयडीवर पाठवावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.