Pune News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी पुणेकरांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा मेट्रो संदर्भात आहे. खरंतर, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील लोकसंख्या गेल्या काही दशकात विक्रमी वाढली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे शहरातील नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसत आहे.
शहरात साधारण एक ते दोन किलोमीटरचा जरी प्रवास करायचा असेल तरी देखील साधारण एक तासभर वाहतूक कोंडीत अडकावे लागते. हेच कारण आहे की, आता शहरातील नागरिकांचा प्रवास जलद, सुरक्षित आणि आरामदायी व्हावा यासाठी आणि शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मेट्रो मार्गांचे जाळे विकसित करण्याचे काम सुरु आहे.
महा मेट्रोच्या माध्यमातून आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थातच पीएमआरडीच्या माध्यमातून आणि पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोचे मोठे नेटवर्क तयार केले जात आहे. आतापर्यंत महामेट्रो कडून दोन मार्गांवर मेट्रो सुरु करण्यात आल्या आहेत.
पीएमआरडीएची मेट्रो अर्थातच पुणेरी मेट्रो अजून सुरू झालेली नाही मात्र येत्या काही महिन्यांमध्ये हा देखील मेट्रो मार्ग पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. पी एम आर डी ए कडून हिंजवडी ते शहरातील मध्यवर्ती भाग शिवाजीनगर दरम्यान मेट्रो मार्ग विकसित केला जात आहे.
सध्या शहरातील पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या मार्गांवर मेट्रो सुरू आहे. विशेष म्हणजे शहरातील या दोन्ही मेट्रो मार्गांचा विस्ताराचे काम देखील सुरू आहे या अंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट या मार्गाचा स्वारगेट पर्यंत आणि वनाज ते रुबी हॉल क्लिनिक या मार्गाचा रामवाडी पर्यंत विस्तार होणार आहे.
सध्या स्थितीला या विस्तारित मार्गांचे काम सुरू असून डिसेंबर 2023 पर्यंत रुबी हाँल क्लिनिक ते रामवाडी दरम्यान मेट्रो धावणार आहे. तसेच एप्रिल 2024 मध्ये सिविल कोर्ट ते स्वारगेट दरम्यान मेट्रो सुरू होईल असा आशावाद महामेट्रोकडून व्यक्त करण्यात आला आहे.
अशातच आता महा मेट्रोच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी महा मेट्रो ने सर्वकष वाहतूक आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.
आगामी सहा महिन्यात हा आराखडा तयार केला जाईल आणि त्यानंतर शहरात नवीन मेट्रो सुरु होईल अशी माहिती समोर येत आहे. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी लोकसत्ता या वृत्तसंस्थेला सांगितल्याप्रमाणे निगडी ते हिंजवडी असा नवीन मेट्रो मार्ग तयार केला जाणार आहे.
सध्या याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यांनी सांगितले की ज्या मार्गावर अधिकची वर्दळ राहील त्या मार्गावर मेट्रो सुरु करण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. तसेच त्यांनी नाशिक फाटा येथून नाशिकला आणि चाकणला जाणाऱ्या लोकांची संख्या किती याचा अभ्यास केला जाईल असे सांगितले आहे.
तसेच नाशिक फाटा ते चाकण आणि वर्तुळाकार रस्त्यांवर (एचसीएमटीआर) ‘निओ मेट्रो’ विकसित करण्यासाठीचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान 4.14 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे.
केंद्राच्या मंजुरीनंतर निगडी पर्यंत मेट्रो धावणार हे स्पष्ट झाले असून येत्या तीन महिन्यात या प्रकल्पासाठीचे भूसंपादन पूर्ण केले जाईल आणि तीन महिन्यानंतर या मेट्रो मार्गाचे प्रत्यक्षात काम सुरू होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे हा मेट्रो मार्ग काम सुरू झाल्यानंतर साडेतीन वर्षांच्या विक्रमी काळात तयार करण्याचे नियोजन आहे.