Pune News : पुण्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. ती म्हणजे जिल्ह्यातील काही भागात डिसेंबर महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई मिळणार आहे. यामुळे सदर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, डिसेंबर 2023 मध्ये जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातल्या बहुतांशी गावात तुफान गारपीट झाली होती.
टाकळी हाजी, साबळेवाडी, माळवाडी, कवठे येमाई, मुंजाळवाडी, खैरेनगर, सविंदणे ,पाबळ , केंदुर, फाकटे, काठापुर , इचकेवाडी, कान्हुर मेसाई, वाघाळे या गावातील शेतकऱ्यांचे गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले.
अचानक आलेल्या वादळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे येथील शेतकऱ्यांचे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. शिवाय फळ पिकांचे देखील अतोनात नुकसान झाले. अगदी तळहाताच्या फोडा प्रमाणे जोपासलेले पीक गारपिटीमुळे वाया गेले.
यामुळे या सदर भागातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी अशी मागणी केली जात होती. ही मागणी आणि नुकसानीची दाहकता पाहता प्रांत अधिकारी हरीष सुळ, तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी तातडीने सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केलेत.
प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांनी या प्रकरणाची गांभीर्यता पाहता कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांना आदेश दिलेत अन कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या भागातील पिकाचे प्रत्यक्ष पंचनामे केले गेलेत.
पंचनामे झाल्यानंतर नुकसान भरपाई मिळण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे जमा झाला. यात 2,707 शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पंचनामे करण्यात आलेत.
दरम्यान या सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने 3 कोटी 22 लाख रुपयांची रक्कम नुकत्याच काही दिवसांपूर्वी मंजूर केली असून आता या शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे.
त्यासाठी मात्र या सदर शेतकऱ्यांना केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. शिरूर तालुक्यातील बेटभागासह पश्चिम पट्यातील १४ गावात वादळवाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.
याच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात 3 कोटी 22 लाख रुपयांची मदत वर्ग करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. परिणामी या सदर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.
मात्र या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केवायसी करावी लागणार आहे. केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच नुकसान भरपाईची रक्कम सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आहे.