Pune News : पुण्यासह संपूर्ण राज्यभरातील शेतकरी अलीकडे शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू लागले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले आहे. फक्त पारंपारिक पिकांची शेती केली तर शेतीमधून फारशी कमाई होत नाही. यामुळे शेतकऱ्यांनी आता पारंपारिक पिकांना बगल दिली आहे.
पारंपारिक पिकांऐवजी आता नगदी पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. शेतकऱ्यांनी केलेला हा बदल काही अंशी त्यांच्यासाठी फायदेशीर देखील ठरलेला आहे. पुण्यातील चाकण येथील प्रयोगशील शेतकऱ्याने देखील हे आपल्या उदाहरणातून दाखवून दिले आहे.
खरे तर चाकणमध्ये अलीकडे मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात शहरीकरण आणि औद्योगीकरण होऊ लागल्याने येथे शेतीचे क्षेत्र कमी झाले आहे.
या परिसरात शेतीऐवजी आता इतर उद्योगधंद्यांनी आपला चांगला जम बसवला आहे. तथापि, या भागात असेही अनेक प्रयोगशील शेतकरी आहेत जे शेती मध्ये नवनवीन प्रयोग करत आहेत आणि चांगली कमाई देखील करत आहेत.
चाकण येथील प्रयोगशील शेतकरी सुरेश परदेशी यांनीही ड्रॅगन फ्रुट लागवडीतून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. परदेशी एक यशस्वी उद्योजक आहेत. पण आपल्या उद्योग, व्यवसायासोबतच त्यांनी काळ्या आईशी इमान सुद्धा राखला आहे
. परदेशी यांनी त्यांच्या अकरा गुंठे माळरान जमिनीवर विदेशात येणारे ड्रॅगन फ्रुट यशस्वीरीत्या उत्पादित करून दाखवले आहे. विशेष म्हणजे त्यांनी सेंद्रिय पद्धतीने ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन घेतले आहे. त्यांनी दोन वर्षांपूर्वी ड्रॅगन फ्रुटची लागवड केली आहे.
अकरा गुंठ्यात दहा बाय सहा अंतरावर ड्रॅगन फ्रुट लागवड केली. यासाठी 150 पोल आणि रिंग बसवली. एका पोलवर चार रोपे चढवलीत. तसेच पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन बसवले. अकरा गुंठ्यासाठी त्यांना जवळपास दीड लाखांचा खर्च आला.
आता मात्र दोन वर्षांपूर्वी लावलेल्या या बागेतून त्यांना उत्पादन मिळू लागले आहे. पहिल्यांदाच त्यांना यातून एक टन एवढे उत्पादन मिळाले आहे. किलोला 160 रुपयाचा भाव मिळाला असल्याने त्यांना 11 गुंठ्यातच चांगली कमाई झाली आहे.
विशेष म्हणजे पुढील वर्षी दीड टन पर्यंतचे उत्पादन मिळणार अशी आशा त्यांना आहे. परदेशी सांगतात की ड्रॅगन फ्रुट च्या फळांवर मोठ्या प्रमाणात मधमाशा गोळा होता. यामुळे त्यांनी मधमाशी पालन हा देखील एक साईड बिझनेस सुरू केला आहे.
यामुळे त्यांना ड्रॅगन फ्रुटच्या शेतीतून दुहेरी उत्पादन मिळणार आहे. निश्चितच चाकण मधील एका यशस्वी उद्योजकाने शेतीमध्ये केलेला हा यशस्वी प्रयोग इतरांसाठी देखील मार्गदर्शक राहणार आहे यात तीळ मात्र देखील शंका नाही.