Pune Nashik Travel : पुणे आणि नाशिक ही महाराष्ट्रातील दोन महत्त्वाची शहरे आता रेल्वे मार्गाने जोडली जाणार आहेत. पुणे ते नाशिक दरम्यान राज्यातील पहिला सेमी हाय स्पीड रेल्वे प्रकल्प तयार होणार आहे. खरे तर हा प्रकल्प काही तांत्रिक कारणांमुळे रखडला आहे.
मात्र आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले असल्याने या प्रकल्पाला गती मिळणार आहे. या प्रकल्पासाठी जो नवीन डीपीआर म्हणजेच सर्वकष प्रकल्प अहवाल तयार केला जात होता त्याचे काम जवळपास पूर्णत्वाकडे आले आहे.
नवा डीपीआर तयार झाल्यानंतर या प्रकल्पाच्या कामाला आणखी गती मिळणार आहे. मात्र या नव्या डी पी आर मुळे या रेल्वे मार्गाची लांबी वाढणार असून प्रवासाचा कालावधी देखील थोडासा वाढणार आहे. या प्रकल्पासाठी नवा डीपीआर तयार होत आहे मात्र हा रेल्वे मार्ग जुन्या प्रस्तावित मार्गानेच म्हणजेच संगमनेरमार्गेचं पूर्ण होणार आहे.
या रेल्वे मार्गाची लांबी 235 किलोमीटर एवढी राहणार असून यावर 20 रेल्वे स्टेशन प्रस्तावित आहेत. या प्रकल्पाचे काम वर्कऑर्डर निघाल्यानंतर पाच वर्षांच्या कालावधीतच पूर्ण करावे लागणार आहे. या प्रकल्पामुळे नाशिक, पुण्यासमवेतच अहिल्यानगर जिल्ह्यातील विकासाला देखील चालना मिळणार आहे.
या तिन्ही जिल्ह्यातील कृषी आणि औद्योगिक क्षेत्राला हा प्रकल्प एक नवीन दिशा देणारा ठरणार आहे. या नव्या प्रकल्पामुळे पुणे ते नाशिक दरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे. सध्या या प्रवासासाठी प्रवाशांना साडेपाच तास लागतात पण जेव्हा हा रेल्वे मार्ग सुरू होईल तेव्हा हा प्रवासाचा कालावधी दोन ते अडीच तासांवर येणार आहे.
या प्रकल्पाच्या संदर्भात खासदार राजाभाऊ वाजे यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती. यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पाच्या नव्या डी पी आर चे काम अंतिम टप्प्यात असून येत्या काही दिवसांनी या प्रकल्पाचे काम सुरू होणार अशी माहिती दिली होती.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की सुरुवातीला या प्रकल्पासाठी महारेलच्या माध्यमातून जो DPR तयार करण्यात आला होता त्यात नारायणगाव येथील ‘जीएमआरटी’चा तसेच नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्सद्वारे संचालित जायंट मेट्रोवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (रेडिओ टेलिस्कोप) हे दोन संवेदनशील प्रकल्प मध्यात येत होते.
मात्र, ही बाब रेल्वे मंत्रालयाच्या लक्षात येताच याचा नवीन प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार नव्या डीपीआर चे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू असून आता हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यामुळे नव्या वर्षात अर्थातच 2025 मध्ये या प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात सुरू होऊ शकते अशी आशा आता व्यक्त होऊ लागली आहे.