Pune Nashik Highway : मुंबई, पुणे आणि नाशिक या शहरांना महाराष्ट्राचा सुवर्ण त्रिकोण अस म्हणतात. मात्र नाशिक शहराचा विकास हा इतर दोन शहरांच्या तुलनेत काहीसा कमी आहे. विशेष बाब अशी की, स्वातंत्र्याच्या जवळपास आठ दशकानंतरही नाशिकहुन थेट पुण्याला जाण्यासाठी रेल्वे मार्ग तयार झालेला नाही.
मात्र नाशिक ते पुणे दरम्यान सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग प्रस्तावित आहे. सध्या स्थितीला हा प्रकल्प काही प्रशासकीय आणि तांत्रिक कारणांमुळे रखडला असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु लवकरच या प्रकल्पाचे काम सुरू होईल अशी आशा येथील नागरिकांना आहे.
अशातच, मात्र आता नाशिक ते पुणे आणि पुणे ते नाशिक दरम्यान रस्ते मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे आता लवकरच पुणे ते नाशिक हा प्रवास सुसाट होणार आहे. कारण की, नाशिक ते पुणे दरम्यान प्रस्तावित करण्यात आलेल्या औद्योगिक महामार्गासाठीचे भूसंपादन आता लवकरच सुरु होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हा औद्योगिक महामार्ग विकसित केला जाणार असून राज्य रस्ते विकास महामंडळाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. महामंडळाने सदर महामार्गासाठी भूसंपादन अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.
तसेच जमीन अधिग्रहणाची अधिसूचना देखील निर्गमित करण्यात आली आहे. यामुळे लवकरच या मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होईल आणि भूसंपादन झाल्यानंतर प्रत्यक्षात वर्क ऑर्डर पास होत या महामार्गाचे बांधकाम सुरू होईल असे चित्र आहे.
कसा असणार मार्ग
पुणे ते नाशिक दरम्यान 213 किलोमीटर लांबीचा महामार्ग विकसित होणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळ या महामार्गाची उभारणी करणार आहे. या महामार्गासाठी 8981 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
यामध्ये भूसंपादनाचा देखील खर्च समाविष्ट राहणार आहे. खरेतर, या महामार्गाला गेल्या महिन्यातच मंजुरी मिळालेली आहे.
या महामार्गाच्या आखणीला राज्य सरकारने गेल्या महिन्यात अर्थातच फेब्रुवारीमध्ये मंजुरी दिलेली आहे. हा मार्ग पुणे, अहमदनगर आणि नासिक या तीन जिल्ह्यांना जोडणार आहे.
या महामार्गात पुणे ते शिर्डी असा १३४ किलोमीटरचा भाग, चेन्नई-सुरत महामार्गाचा शिर्डी इंटरचेंज ते निफाड इंटरचेंज असा ६० किमीचा भाग, चेन्नई-सुरत महामार्ग ते नाशिक असा निफाड राज्य महामार्गाचा १८ किलोमीटरचा भाग अशा तीन टप्प्यात हा महामार्ग तयार होणार आहे.