Pune-Mumbai Expressway : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा महामार्ग प्रकल्प असून या प्रकल्पामुळे पुणे ते मुंबई दरम्यानचा प्रवास वेगवान झाला होता. पण अलीकडे या मार्गावर वाहनांची संख्या वाढली असल्याने काही ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या प्रवाशांना भेडसावत आहे. हेच कारण आहे की या मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या महामार्गावर मिसिंग लिंकचे काम हाती घेतले.
खरे तर या मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम गेल्यावर्षी म्हणजेच 2024 अखेरपर्यंत पूर्ण होईल असे म्हटले जात होते. परंतु याचे काम नियोजित वेळेत पूर्ण झाले नाही. दरम्यान आता या प्रकल्पाबाबत मोठे अपडेट समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या सहा महिन्यांनी या प्रकल्पाचे काम पूर्ण होईल आणि त्यानंतर हा प्रकल्प सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे ते मुंबई दरम्यानचे अंतर ६ किलोमीटरने कमी होणार आहे. यामुळे प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाचणार असून मुंबई ते पुणे दरम्यानची वाहतूक गतिमान होईल अशी आशा आहे. मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम दोन भागात सुरू आहे. बोगदा आणि केबल स्टेट पूल अशा दोन भागात याचे काम केले जात आहे.
या प्रकल्पा अंतर्गत नऊ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम केले जात असून या बोगद्यात अजूनही काही कामे बाकी आहेत. या बोगद्याला टायगर दरीत केबल स्टेड पुलाच्या माध्यमातून जोडणी दिली जाणार आहे. या टायगरदरीतील 132 मीटर उंच केबल स्टेड पुलाचे काम देखील अजून पूर्ण झालेले नाही.
पण ही सर्व कामे जून 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे टार्गेट राज्य रस्ते विकास महामंडळाने ठेवले आहे. मिसिंग लिंक प्रकल्प खंडाळा घाट विभागाला बायपास करणार आहे. म्हणजे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे ते मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खंडाळा घाटातून जाण्याची आवश्यकता राहणार नाही.
पुण्याहून थेट मुंबईकडे जाणाऱ्या नागरिकांना खंडाळा घाट टाळून बोगद्यातून प्रवास करता येणार आहे. त्यामुळे दोन शहरांतील अंतर कमी होईल. परिणामी प्रवाशांच्या वेळेत सुमारे २५ मिनिटांची बचत होईल. या प्रकल्पासाठी सुमारे सहा हजार ६९५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
सध्या खंडाळा घाटात तीव्र वळण आहे आणि यामुळे अपघातांची संख्या वाढते. घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सुद्धा होते. मात्र हा रस्ते प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण कमी होणार आहे आणि कमी वेळेत प्रवास करता येणार आहे.