Pune Metro News : पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील वाहतूक कोंडी पाहता शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून शहरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. शहरात सध्या दोन मेट्रो मार्ग सुरू असून या मेट्रो मार्गांमुळे शहरातील वाहतूक कोंडी आता बऱ्यापैकी कमी झाली आहे. पण अजूनही शहरातील असे अनेक भाग आहेत ज्यांना थेट मेट्रोची कनेक्टिव्हिटी मिळालेली नाही.
यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न पूर्णपणे निकाली निघालेला नाही. पण भविष्यात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोचे आणखी काही नवीन मार्ग तयार होणार आहेत यामुळे शहरातील वाहतूक कोंडी आगामी काळात पूर्णपणे दूर होईल असा विश्वास व्यक्त होतोय.
सध्या पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरू आहे. या मार्गांवरील प्रवाशांची संख्या ही लाखोंच्या घरात पोहोचली आहे. या मार्गांचा पुणेकरांना मोठ्या प्रमाणात फायदा होतोय. दुसरीकडे पुण्यातील या मेट्रो मार्गांचा विस्तार देखील सुरू करण्यात आला आहे.
स्वारगेट ते पिंपरी चिंचवड या मेट्रो मार्गाचा विस्तार थेट निगडी पर्यंत करण्यात येणार असून या विस्ताराचे काम सुरू देखील झाले आहे. या विस्तारित मेट्रो मार्गाचे काम नुकतेच सुरू झाले असून हा प्रकल्प येत्या काही महिन्यांनी पुणेकरांच्या सेवेत येणार आहे.
त्यामुळे पुण्यातील जनतेचा प्रवास आणखी वेगवान होणार आहे. हा विस्तारित मेट्रो मार्ग निगडी येथील भक्ती शक्ती चौकापर्यंत राहणार असून याचा फायदा या भागातील प्रवाशांना होणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिका ते निगडी या विस्तारित मेट्रोमार्गाबाबत बोलायचं झालं तर हा मार्ग 4.413 किलोमीटर लांबीचा राहणार आहे.
या मार्गावर चिंचवड स्टेशन (महावीर व अहिंसा चौक), आकुर्डी (खंडोबा माळ चौक), निगडी (टिळक चौक व भक्ती-शक्ती चौक) ही स्थानके विकसित केली जाणार आहेत. या विस्तारित मेट्रो मार्गाचे काम नुकतेच सुरू झाले आहे.
यामुळे मुंबई-पुणे महामार्गाच्या परिसरातील चिंचवड, आकुर्डी, निगडी या गावांसह चिखली, तळवडे, संभाजीनगर, शाहूनगर, यमुनानगर, प्राधिकरण, रावेत, किवळे, मामुर्डी या गावांचीही कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.
या गावातील नागरिकांना देखील अप्रत्यक्षरीत्या या मेट्रो मार्गाचा फायदा होणार आहे. म्हणून येथील नागरिकांनी हा मेट्रो मार्ग लवकरात लवकर तयार व्हावा आणि यावर लवकर वाहतूक सुरू व्हावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.