Pune Metro News : मेट्रो हा पुणेकरांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. गेल्या काही वर्षांमध्ये शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी शहरात आणि उपनगरात मेट्रोचे जाळे विकसित केले जात आहे. खरंतर पुणे शहर शिक्षणाचे माहेरघर म्हणून जगात ख्यातीप्राप्त आहे.
शहराला राज्याच्या सांस्कृतिक राजधानीचा देखील दर्जा देण्यात आला आहे. मात्र महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे हे शहर गेल्या काही वर्षांमध्ये वाहतूक कोंडी साठी विशेष ओळखले जाऊ लागले आहे. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका महाराष्ट्र राज्य शासन यांच्या माध्यमातून सामूहिक प्रयत्न केले जात आहेत.
याचा प्रयत्नाचा एक भाग म्हणून शहरात गेल्या महिन्यात विस्तारित मेट्रो मार्ग सुरू करण्यात आले आहेत. वनाज ते रुबी हॉल क्लिनिक आणि पिंपरी चिंचवड ते सिव्हिल कोर्ट या दोन महत्त्वाच्या मार्गावर विस्तारित मेट्रो मार्ग सुरू झाले आहेत. विशेष म्हणजे या विस्तारित मेट्रो मार्गांना प्रवाशांनी मोठा प्रतिसाद दाखवला आहे. या मेट्रो मार्गामुळे प्रवाशांचा प्रवास गतिमान झाला आहे.
अशातच आता पुणेकरांसाठी मेट्रो संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. ती म्हणजे पुण्यातील मेट्रोचा विस्तार आता थेट लोणी काळभोर आणि सासवड पर्यंत होणार असल्याचे चित्र आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता पुण्यातील हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर ते सासवड या दोन महत्त्वाच्या मार्गावर मेट्रो प्रस्तावित करण्यात आली आहे.
याचा डीपीआर देखील महामेट्रोने तयार केला आहे. विशेष बाब म्हणजे हा डीपीआर आता महापालिकेकडे सादर झाला आहे. आता महापालिका या डीपीआरला स्थायी समितीमध्ये मंजुरी देणार आहे आणि त्यानंतर महापालिकेच्या मुख्य सभेत या प्रस्तावाला मंजुरी दिली जाणार आहे. महापालिकेकडून मंजुरी घेतल्यानंतर या प्रकल्पासाठी राज्य आणि केंद्र शासनाकडून मंजुरी घेतली जाणार आहे.
कसा असणार मार्ग
महा मेट्रो ने तयार केलेल्या डीपीआर नुसार हडपसर ते लोणी काळभोर यादरम्यान 11.35 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग विकसित केला जाणार आहे. तसेच हडपसर ते सासवड दरम्यान 5.57 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग होणार आहे. म्हणजेच या दोन्ही मेट्रो मार्गांची जवळपास 17 किलोमीटर ची लांबी राहणार आहे. यासाठी 4757 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
कोणकोणती स्थानके राहणार
हडपसर ते लोणी काळभोर या मार्गावर हडपसर, हडपसर फाटा, हडपसर बस डेपो, आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी, स्टड फार्म, मांजरी फाटा, द्राक्ष बाग, टोलनाका, वाकवस्ती, लोणी काळभोर ही स्थानके महा मेट्रो कडून विकसित केली जाणार आहेत. तसेच हडपसर ते सासवड या मार्गावर एव्हिएशन ग्राउंड, फुरसुंगी आयटी पार्क, सुलभ गार्डन आणि सासवड रेल्वे स्टेशन ही स्थानके महा मेट्रो विकसित करणार असल्याची माहिती डी पी आर मधून पुढे आली आहे.