Pune Metro News : मुंबई, पुणे, नागपूर सारख्या शहरांमध्ये गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या जाणवू लागली आहे. ही वाहतूक कोंडीची समस्या दूर व्हावी यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून शहरात मेट्रोचे जाळे विकसित करण्यात आले आहे.
महत्त्वाचे म्हणजे हे जाळे आणखी विस्तारले जात आहे. सध्या शहरात पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट आणि वनाज ते रामवाडी या मार्गावरील मेट्रो सुरू आहे. खरे तर पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट हा मार्ग थेट स्वारगेट पर्यंत जातो.
पण सिविल कोर्ट ते स्वारगेट या टप्प्याचे काम अजून पूर्ण झालेले नाही त्यामुळे याचे उद्घाटन अजून बाकी आहे. मात्र या मार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या मेट्रो मार्गाचे काम जवळपास अंतिम टप्प्यात आले असून फक्त काही तांत्रिक परवानग्या बाकी असल्याची माहिती समोर आली आहे.
एवढेच काय तर याच्या उद्घाटनाची तारीख देखील ठरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिविल कोर्ट ते स्वारगेट हा भूमिगत मेट्रो मार्ग 26 सप्टेंबर 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू होणार आहे.
मोदी यांच्या हस्ते या मेट्रो मार्गाचे उद्घाटन होईल आणि त्यानंतर लगेचच हा मार्ग सर्वसामान्यांसाठी वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. नरेंद्र मोदी यांचा दौरा 26 सप्टेंबरला नियोजित आहे. आता याच पुणे दौऱ्यादरम्यान सिविल कोर्ट ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाईल असा दावा केला जात आहे.
सिविल कोर्ट म्हणजेच जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा भूमिगत मेट्रोमार्ग पुणेकरांच्या सेवेत येत्या 26 सप्टेंबर पासून दाखल होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने आवश्यक पूर्वतयारींनी वेग घेतला आहे. आवश्यक बाबींची पूर्तता करण्याचे काम महामेट्रोकडून अगदीच युद्ध पातळीवर सुरू आहे.
सहा किलोमीटर लांबीच्या या मार्गावरील कसबा पेठ, मंडई आणि स्वारगेट या स्थानकांचे काम पूर्ण झाले आहे. काही स्थानकांची नावे बदलण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून याबाबतचे गॅझेटही लवकरच प्रसिद्ध होणार आहे. अर्थातच हा मेट्रोमार्ग 26 सप्टेंबरला पुणेकरांसाठी खुला होणार हे फिक्स झाले आहे.
महत्त्वाचे म्हणजे या मार्गाचा विस्तारित टप्पा अर्थात स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा देखील यावेळी होणार आहे. म्हणजे पुणेकरांना नजीकच्या भविष्यात आणखी एका नवीन मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे.