Pune Metro News : पुण्यातील मेट्रोचे जाळे जलद गतीने विकसित होत आहे. सध्या पुणे शहरात महा मेट्रोच्या माध्यमातून दोन मेट्रो मार्ग सुरू करण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर सध्या मेट्रो सुरू असून या मेट्रो मार्गांना पुणेकरांच्या माध्यमातून जबरदस्त प्रतिसाद सुद्धा मिळतोय. इथे एक गोष्ट विशेष अशी की या दोन्ही मेट्रो मार्गांचा विस्तार देखील सुरू आहे.
यामुळे पुण्यातील अनेक महत्त्वाचे भाग मेट्रो शी जोडले जाणार आहेत आणि यामुळे पुणेकरांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. दुसरीकडे, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून देखील मेट्रोचे काम हाती घेण्यात आले असून पीएमआरडीएकडून विकसित होणाऱ्या मेट्रो मार्गाच्या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान मेट्रो मार्ग विकसित होत आहे. या मेट्रो मार्गाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू असून नव्या वर्षात या मेट्रो मार्गाची पुणेकरांना भेट मिळणार आहे. यामुळे शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान चा प्रवास वेगवान होणार असून पुणेकरांना नक्कीचं याचा मोठा फायदा होईल.
नवीन वर्षात ही मेट्रो सुरू होणार असून, आयटीयन्स, चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यानच्या मेट्रो मार्गाचे म्हणजेच पुणेरी मेट्रोचे काम हे गेल्या काही महिन्यांपासून जलद गतीने सुरू आहे.
पुणेरी मेट्रोचे आत्तापर्यंत निम्म्यापेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे. यामुळे या मेट्रो मार्गाचे काम नियोजित वेळेत पूर्ण होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे. मार्च 2025 अखेर येथून मेट्रो ट्रेन धावणार असा अंदाज अधिकाऱ्यांकडून वर्तवला जात आहे.
त्यामुळे रोजच्या वाहतूक कोंडीने वैतागलेल्या कंपन्यांमधील चाकरमानी आणि आयटीयन्सला लवकरच दिलासा मिळणार आहे. हिंजवडी भागात पुण्यातील सर्वाधिक मोठे औद्योगिक आणि आयटी क्षेत्र आहे. या भागात असंख्य कर्मचारी, अधिकारी वर्ग कामानिमित्त दररोज आपल्या खासगी आणि कंपन्यांच्या वाहनाने (बस, कार) ये- जा करतात.
येथील कोंडीने कर्मचारी आणि स्थानिक रहिवासी अक्षरश: वैतागलेले आहेत. त्यापार्श्वभूमीवर प्रशासनाने येथील नागरिकांच्या सोयीसाठी मेट्रो सुरू करण्याचे काम सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे काम सुरू आहे. ते नवीन वर्षात पूर्ण होणार आहे. त्यामुळे रोजच्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.