Pune Metro News : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे पुणे शहरातील नागरिकांना आणखी एका मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे. सध्या स्थितीला पुणे शहरात पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विकसित होत असलेल्या शिवाजीनगर ते हिंजवडी यादरम्यान चा मेट्रो मार्ग देखील लवकरच सुरू होणार आहे.
यामुळे हिंजवडी ते शिवाजीनगर यादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. सध्या पुण्यात ज्या मार्गांवर मेट्रो सुरू आहे त्या मेट्रो मार्गांना पुणेकरांच्या माध्यमातून चांगला जबरदस्त प्रतिसाद मिळत असून यामुळे पुण्यातील नागरिकांचा प्रवास सुपरफास्ट झाला आहे.
या मेट्रो मार्गांमुळे शहरातील रस्त्यांवरील वाहनांचा भार आणि वाहतूक कोंडी देखील बऱ्यापैकी कमी झाली आहे. विशेष बाब अशी की या मेट्रो मार्गांचे विस्तारीकरण देखील सुरु आहे. महा मेट्रोच्या माध्यमातून निगडी पर्यंत मेट्रो चालवली जाणार असून सध्या या मार्गाचे काम सुरू आहे.
दुसरीकडे देहूरोड ते निगडी या मार्गावरही मेट्रो सुरु केली पाहिजे अशी मागणी आता प्रवाशांच्या माध्यमातून जोर धरत आहे. महत्त्वाचे म्हणजे याबाबतचा पाठपुरावा देखील आता सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे देहूरोड शहर युवक अध्यक्ष आशिष बंसल यांनी याबाबतचा पाठपुरावा सुरू केला आहे.
आशिष यांनी मावळचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांना निगडी ते देहू रोड असा मेट्रो मार्ग विकसित करावा यासाठी एक निवेदन सादर केले आहे. खरे तर महाराष्ट्र ही संतांची भूमी. याच संतांच्या भूमीतील श्रीक्षेत्र देहूगाव हे महाराष्ट्रातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे.
दरम्यान श्री क्षेत्र देहू गाव हे मेट्रोच्या नकाशावर आणण्यासाठी देखील आता प्रयत्न सुरू झाले आहेत. श्रीक्षेत्र देहूगाव येथे येणाऱ्या वारकऱ्यांची आणि भाविकांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. येथे महाराष्ट्रासहित राज्याबाहेरील देखील अनेक भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात.
यामुळे या भाविकांच्या सोयीसाठी श्रीक्षेत्र देहुगाव हे मेट्रोच्या नकाशावर येणे आवश्यक आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन अजित पवार गटाचे देहूरोड शहर युवक अध्यक्ष आशिष बंसल यांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडे निगडी ते देहूरोड असा मेट्रो मार्ग तयार झाला पाहिजे अशी मागणी निवेदन देऊन उपस्थित केली आहे.
आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निगडी येथील भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रो सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. पण या भक्ती शक्ती चौकापासून देहूरोड पर्यंतचे अंतर फारच कमी आहे.
भक्ती शक्ती चौकापासून देहूरोड अवघ्या अडीच किलोमीटर अंतरावर आहे. यामुळे मेट्रो प्रकल्पाचा विस्तार देहूरोड पर्यंत झाला पाहिजे अशी मागणी प्रवाशांकडून उपस्थित केली जात असून यासाठी लोकप्रतिनिधींकडे देखील आता पाठपुरावा सुरू झाला आहे.
नक्कीच भक्ती शक्ती चौकापासून पुढे देहूरोड पर्यंत मेट्रो मार्गाचा विस्तार झाला तर याचा नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. तथापि, स्थानिकांच्या या मागणीकडे कशा पद्धतीने पाहिले जाते, आमदार शेळके याबाबत सरकारकडे पाठपुरावा करतात का ? या साऱ्या गोष्टी पाहण्यासारख्या ठरणार आहेत.