Pune Metro News : वेगाने विकसित होत असलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीमधील अर्थातच पुण्यातील नागरिकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे शहरात गेल्या काही वर्षांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या मोठी जटील बनली आहे. हीच समस्या सोडवण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम बनवण्यासाठी मेट्रोचे जाळे विणले जात आहे.
सध्या शहरात वनाज ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड महापालिका ते सिविल कोर्ट या मार्गावर मेट्रो सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे सिविल कोर्ट ते स्वारगेट या मार्गावर देखील मेट्रो सुरू होणार होती. 26 सप्टेंबर 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रो मार्गाचे उद्घाटन नियोजित होते.
मात्र ऐनवेळी पाऊस आला आणि मेट्रोच्या उद्घाटनाचा हा मुहूर्त पुढे ढकलण्यात आला. दरम्यान आता या मेट्रो मार्गाच्या उद्घाटनासाठी नवा मुहूर्त गवसला आहे. मिळालेल्या माहीतीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी सिविल कोर्ट ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचे उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून करणार असून याचे उद्घाटन येत्या रविवारी संपन्न होणार आहे.
या मार्गाचे उद्घाटन ऑनलाईन म्हणजेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून 29 सप्टेंबरला केले जाणार असल्याची माहिती सरकारकडून प्राप्त झाली आहे. सिविल कोर्ट ते स्वारगेट हा मेट्रो मार्ग पूर्ण भूमिगत आहे. या मेट्रो मार्गाची लांबी 3.34 किलोमीटर एवढी आहे.
या मार्गावर कसबा पेठ, मंडई आणि स्वारगेट ही तीन स्थानके आहेत. यातील सिविल कोर्ट ते कसबा मेट्रोस्थानक हे अंतर ८५३ मीटर एवढे आहे. कसबा पेठ ते मंडई मेट्रोस्थानक हे अंतर एक किलोमीटर एवढे आहे. मंडई ते स्वारगेट मेट्रो स्थानक हे अंतर 1.48 किलोमीटर एवढे आहे.
म्हणजेच या संपूर्ण मेट्रो मार्गाची लांबी 3.34 किलोमीटर एवढी आहे. या मेट्रो मार्ग प्रकल्पामुळे सिविल कोर्ट ते स्वारगेट हा प्रवास वेगवान होणार आहे. यासोबतच स्वारगेट ते कात्रज या विस्तारित मेट्रो मार्ग प्रकल्पाचे देखील येत्या काही दिवसांनी भूमिपूजन होणार आहे.
यामुळे पिंपरी चिंचवड महापालिका ते कात्रज दरम्यान मेट्रो ने प्रवास करता येणे शक्य होईल. हा विस्तारित मेट्रो मार्ग 5.46 किलोमीटर लांबीचा असेल. या विस्तारित मेट्रो मार्गावर मार्केट यार्ड, बिबवेवाडी, बालाजीनगर आणि कात्रज ही स्थानके विकसित केली जाणार आहेत.
त्यासाठी 2954.53 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मेट्रो मार्गाचे काम 2019 पर्यंत पूर्ण करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवली जाईल आणि प्रत्यक्षात दोन ते तीन महिन्यानंतर कामाला सुरुवात होणार अशी माहिती जाणकारांकडून समोर आली आहे.