Pune Metro News : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी विद्येचे माहेरघर आणि आयटी हब म्हणून ख्यातीप्राप्त पुणेकरांना वाहतूक कोंडीचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो. मात्र पुण्यातील ही वाहतूक कोंडी लवकर सुटणार आहे. कारण की शहरातील मेट्रो मार्गांचा आता विस्तार होणार आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की शहरात सध्या दोन मार्गांवर मेट्रो धावत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाजी ते रामवाडी या मार्गांवर सध्या मेट्रो सुरू असून याच दोन्ही मार्गांचा पुढे विस्तार केला जाणार आहे. पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील विस्तारीकरणाच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) ते निगडी या मार्गासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, या मार्गाचे काम सुरू आहे.
तसेच स्वारगेट ते कात्रज मार्गाच्या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच या प्रकल्पासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. दुसऱ्या फेजमध्ये मात्र चक्क सात नवीन विस्तारित मेट्रो मार्ग तयार केले जाणार आहेत.
महामेट्रोच्या (पुणे मेट्रो) दुसऱ्या टप्प्यात एकूण ७ मार्गांवर मेट्रोचा विस्तार करण्याची योजना असून, त्यापैकी ४ मार्गांना केंद्र सरकारकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाही. तसेच दोन मार्गांना पुणे महापालिकेची म्हणजेच पीएमसी ची मंजुरी मिळणे बाकी आहे.
आणि एक मार्ग अजूनही भविष्याच्या गर्भात आहे त्याचा डी पी आर तयार होणे आणि त्या पुढील प्रक्रिया बाकी आहे. अशा परिस्थितीत आता आपण या सात मेट्रो मार्गांची सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत. या सात विस्तारित मेट्रो मार्गांची लांबी आणि त्या मार्गांवर किती स्थानके तयार होणार याचा आता आपण आढावा घेणार आहोत.
कसे असतील पुण्यातील 7 मेट्रो मार्ग?
1) वनाज ते चांदणी चौक : हा 1.2 km लांबीचा मार्ग असून यावर दोनच स्थानके तयार होतील आणि या मार्गासाठी अजून केंद्राची मंजुरी बाकी आहे.
2) रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी : हा 11.63 किलोमीटर लांबीचा मार्ग असून यावर 11 स्थानके तयार होतील आणि हा देखील मार्ग केंद्र शासनाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
3) खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी : हा 25.66 किलोमीटर लांबीचा मेट्रोमार्ग राहणार असून यावर 22 स्थानके तयार होतील आणि हा सुद्धा मेट्रोमार्ग केंद्रातील शासनाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. 4)SNDT-वारजे-माणिकबाग : हा 6.12 km लांबीचा मेट्रोमार्ग राहणार असून या मार्गावर एकूण सहा स्थानके तयार होतील आणि हा सुद्धा मार्ग केंद्रातील सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
5) हडपसर ते लोणी काळभोर : हा मेट्रो मार्ग 11.35 किलोमीटर लांबीचा राहणार असून या मार्गावर एकूण 10 स्थानके विकसित होणार आहेत. हा मेट्रो मार्ग पुणे महापालिकेच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
6) हडपसर ते सासवड : हा मेट्रो मार्ग ५.५७ किलोमीटर लांबीचा राहणार आणि यावर चार मेट्रो स्थानके विकसित केली जाणार आहेत. या मेट्रो मार्गाला सुद्धा पालिकेची मंजुरी मिळणे बाकी आहे.
7) निगडी – मुक्ताई चौक – वाकड – नाशिक फाटा – चाकण : या मेट्रो मार्गाचा सध्या डीपीआर तयार केला जात असून डीपीआर तयार झाल्यानंतर महापालिकेकडून या मार्गाला मंजुरी मिळेल आणि त्यानंतर हा मार्ग राज्य शासनाकडून मंजूर होईल आणि मग पुढे केंद्राच्या मंजुरीसाठी पाठवला जाईल आणि त्यानंतर याचे काम सुरू होणार आहे.