Pune Metro News : पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न हा फार जुना आहे. गेल्या काही वर्षांमध्ये शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. सध्या पुणे शहरात दोन मेट्रो मार्ग सुरू आहेत.
वनाज ते रामवाडी आणि पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट यादरम्यान मेट्रो सुरू आहे. तसेच स्वारगेट ते कात्रज या विस्तारित मेट्रो मार्गाचे नुकतेच भूमिपूजन संपन्न झाले आहे. अर्थातच या मार्गाचे लवकरच काम सुरू होणार असून भविष्यात कात्रज पर्यंत मेट्रो ने प्रवास करता येणे शक्य होणार आहे.
दुसरीकडे, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून ‘बांधा-वापरा-हस्तांतरित’ करा या तत्वावर शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेची कामे प्रगतीपथावर आहेत. महत्त्वाचे म्हणजे काल अर्थातच सोमवारी राज्य मंत्रिमंडळाने दोन नवीन मेट्रो मार्गांना मंजुरी दिली आहे.
त्यामुळे शहरातील मेट्रोचे जाळे विस्तारणार असून दिवाळीच्या आधीच पुणेकरांसाठी ही एक मोठी भेट ठरणार आहे. या दोन नव्या मार्गांमुळे शहरातील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी नियंत्रणात येईल असा विश्वास पुणेकरांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान आज आपण कालच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आलेल्या या दोन नव्या मेट्रो मार्गाचा रूट कसा आहे, या मार्गावर किती स्थानके विकसित होणार या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसे आहेत नवीन मार्ग
पुणे शहरात खडकवासला ते खराडी आणि नळस्टाॅप ते माणिकबाग असे दोन नवे उन्नत मेट्रो मार्ग विकसित होणार आहेत. या मेट्रो मार्गांना कालच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळालेली आहे. यासाठी 9897 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून याबाबतचा प्रस्ताव दिल्ली दरबारी मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.
या मेट्रो मार्गांबाबत बोलायचं झालं तर पहिला मेट्रो मार्ग हा खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी असा राहणार आहे. तसेच दुसरा मेट्रो मार्ग हा नळस्टाॅप-वारजे-माणिकबाग असा राहणार आहे. यातील खडकवासला ते खराडी मार्गाची एकूण लांबी २५.५१८ किलोमीटर एवढी राहणार आहे.
या उन्नत मेट्रो मार्गावर २२ स्थानके तयार केली जाणार आहेत. या मार्गिकेसाठी ८ हजार ११ कोटी ८१ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. दुसरीकडे, नळस्टाॅप ते माणिकबाग हा ६.११८ किलोमीटर अंतराचा मेट्रो मार्ग विकसित होणार आहे. या मार्गावर सहा स्थानके प्रस्तावित आहेत. त्यासाठी १ हजार ७६५ कोटी ३८ लाखांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती शासनाकडून देण्यात आली आहे.