Pune Local Train : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरातील रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वेचे हजारो किलोमीटर लांबीचे नवीन मार्ग तयार झाले आहेत. तसेच काही रेल्वे मार्गांवर नवीन मार्गीका तयार करण्यात आल्या आहेत. राज्यात नवीन रेल्वे स्थानक देखील तयार केले जात आहे.
तसेच सध्याच्या रेल्वे स्थानकांच्या नूतनीकरणाचे कामही सूरु आहे. पुणे, मुंबई, नागपूर सारख्या शहरांमध्ये मेट्रोचे जाळे देखील विकसित केले जात आहे. अशातच आता पुणेकरांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे.
बहुप्रतीक्षित अन बहुचर्चित पुणे-लोणावळा तिसर्या-चौथ्या रेल्वे लोकल मार्गिकेचे काम आता सुरु होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाचा निम्मे खर्च हा महाराष्ट्र राज्य शासन उचलणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतच्या प्रस्तावावर नुकतीच सही करून याला मंजुरी दिली आहे. यामुळे या मार्गावरील लोकल सेवेचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. परिणामी पुणेकरांचा प्रवास सुपरफास्ट होईल अशी आशा आहे.
खरे तर सुरुवातीला हा प्रकल्प राज्यशासन 25 टक्के आणि उर्वरित 25 टक्के खर्च पुणे व पिंपरी- चिंचवड महापालिका प्रशासनाने करावा असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र पुणे महानगरपालिकेने आणि पिंपरी चिंचवड महापालिकेने या प्रकल्पासाठी खर्च करण्यास असमर्थता दाखवली.
यामुळे हा प्रकल्प आता मार्गी लागणार नाही असे वाटत होते. पण मध्यंतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून निम्मा-निम्मा खर्च करून हा प्रकल्प मार्गी लावला जाईल असे सांगितले गेले.
दरम्यान आता मुख्यमंत्र्यांनी याबाबतच्या प्रस्तावावर सही केल्याची मोठी माहिती समोर आली आहे. केंद्रीय हवाई राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाचा निम्मा खर्च राज्यसरकार करणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी माझे बोलणे झाले असून त्यांनी याबाबतच्या प्रस्तावावर दोन दिवसांपूर्वीच सही केली आहे. यामुळे आता हा प्रकल्प मार्गी लागणार हे स्पष्ट झाले आहे. परिणामी पुण्यातील रेल्वे वाहतूक आधीच्या तुलनेत आणखी सक्षम होणार आहे.