Pune Hubli Vande Bharat Railway News : पुणेकरांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठी कामाचे अपडेट समोर येत आहे. हे अपडेट आहे वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात. सद्यस्थितीला पुण्यातून तीन वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या वंदे भारत एक्सप्रेस सोबतच मुंबई येथील सीएसएमटी ते सोलापूर दरम्यान धावणारी वंदे भारत एक्सप्रेस देखील पुणे मार्गे धावते.
खरंतर पुणे ते हुबळी वंदे भारत एक्सप्रेस नुकत्याच काही महिन्यांपूर्वी सुरू झाली. पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या दोन्ही गाड्या एकाच वेळी सुरू झाल्यात. या दोन्ही गाड्यांचे उद्घाटन देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी यांच्या हस्ते झाले.
यापैकी पुणे ते हुबळी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस संदर्भात आता एक नवीन माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे ते हुबळी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला आणखी एक थांबा मंजूर करण्यात येणार आहे. यासाठी चा पाठपुरावा रेल्वे मंत्रालयाकडे सुरू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बेळगावचे राज्यसभेचे खासदार इराण्णा काडादी यांनी नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली आणि पुणे-बेळगावी-हुबळी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला घटप्रभा रेल्वे स्थानकावर एक मिनिट थांबा मिळावा यासाठी विनंती केली आहे.
खासदार महोदयांनी याबाबतचे निवेदन देखील केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना सुपूर्द केले आहे. विशेष बाब अशी की केंद्र रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खासदार महोदय यांच्या या मागणीवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.
खासदार काडादी यांच्या विनंतीला मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. या बैठकीला केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी सुद्धा उपस्थित होते.
नक्कीच जर घटप्रभा रेल्वे स्थानकावर ही वंदे भारत ट्रेन थांबली तर याचा या भागातील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार असून या भागातील प्रवाशांनी देखील घटप्रभा रेल्वे स्थानकावर ही गाडी थांबली पाहिजे अशी आग्रही मागणी यावेळी बोलून दाखवली आहे. ही गाडी पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि कराड या भागातील प्रमुख शहरांना जोडते.
या गाडीमुळे पुणे ते हुबळी दरम्यान चा प्रवास फारच सुपरफास्ट झाला आहे. दरम्यान आता या गाडीला एक नवीन थांबा मिळणार आहे मात्र याबाबतचा निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून घेतला जाणार असून रेल्वे मंत्रालय या संदर्भातील निर्णय कधीपर्यंत घेणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे.