Pune Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामान कोरडे आहे. मात्र आता पुन्हा एकदा राज्याच्या हवामानात बदल होत असून बंगालच्या उपसागरावर तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुन्हा एकदा राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. खरेतर यंदा देशातून मॉन्सून खूपच माघारी फिरला.
मात्र मान्सून माघारी फिरल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. काही ठिकाणी अक्षरशः ढगफुटी सारखे पावसाची नोंद करण्यात आली आणि यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले.
आता मात्र गत काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामान कोरडे झाले असून राज्यात आता थंडीची तीव्रता वाढत आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये थंडीची चाहूल लागली असून सकाळी सकाळी शेकोट्या पेटू लागल्या आहेत.
दरम्यान, आता भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार असा अंदाज दिला आहे. महाराष्ट्रातील कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान खात्याकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार 14 आणि 15 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे अन म्हणून राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी हलक्या स्वरूपाचा पाऊस होणार असा अंदाज देण्यात आला आहे.
पुणे हवामान विभागाने राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि मराठवाडा विभागातील धाराशिव या आठ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज दिला आहे.
कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील या संबंधित जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याने या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी कृषी क्षेत्रातील जाणकारांनी केले आहे. खरे तर सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये रब्बी हंगामातील पिकांची पेरणी सुरू आहे.
तसेच काही ठिकाणी नुकतीच पेरणी पूर्ण झाली आहे. दरम्यान आता राज्यात पावसाची शक्यता असल्याने आणि ज्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे तेथील किमान तापमानाचा वाढणार असा अंदाज असल्याने रब्बी हंगामातील पिकांवर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो अशी भीती आता व्यक्त होऊ लागली आहे.
पावसाळी वातावरणामुळे किमान तापमान वाढेल, थंडीची तीव्रता कमी होईल ढगाळ हवामानामुळे आणि पावसाळी वातावरणामुळे विविध कीटकांचा आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढेल असं काही जाणकारांकडून सांगितले जात आहे.