Pune Bengaluru Expressway : गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच पूर्ण झाला आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर खातेवाटप ही पूर्ण झाले आहे. दरम्यान खातेवाटप झाल्यानंतर फडणवीस सरकारच्या कामाचा वेग वाढला आहे. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद देण्यात आले असून आपल्या पदाचा कारभार स्वीकारल्यानंतर शिवेंद्रसिंह राजे प्रथमच साताऱ्यात आलेत.
साताऱ्यात आल्यानंतर त्यांनी पुणे बेंगलोर महामार्गाबाबत मोठी अपडेट दिली. यावेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी पुणे बेंगळुरू महामार्गाच्या कामाबाबत भाष्य केले. शिवेंद्रसिंहराजे म्हणालेत की, पुणे – बंगळुरू महामार्गातील पुणे ते सातारा दरम्यानच्या रस्ते विकासाची अनेक कामे अपुरी आहेत.
या अपुऱ्या कामांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी अपघातांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले असून नागरिकांमध्ये सरकार विरोधात रोष आहे.
याच साऱ्या पार्श्वभूमीवर शिवेंद्रसिंह राजे यांनी आपल्या विभागाचा कारभार स्वीकारल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी या महामार्गाच्या दुरावस्थेबाबत शिवेंद्रसिंह राजे यांनी नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार केली.
या वेळी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी याची दखल घेत या कामावरील ठेकेदार कंपनी ‘रिलायन्स’कडून हेकाम काढून घेऊन दुसऱ्या कंपनीला देण्याचे ठरल्याचे सांगितले आहे. महत्त्वाची बाब अशी की ठेकेदार बदलाबाबतची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
दरम्यान आता मुंबई अथवा दिल्ली येथे लवकरच याबाबत बैठक घेऊन हे काम काढून दुसऱ्या ठेकेदाराला देण्यात येणार असल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले आहे. त्यामुळे हे रखडलेले काम आता लवकरच सुरू होईल आणि लवकरात लवकर हे काम पूर्ण होईल अशी आशा व्यक्त होऊ लागले आहे. नक्कीच या महामार्गाचे रखडलेले काम पूर्ण झाले तर पुणे ते सातारा दरम्यान चा प्रवास वेगवान होणार आहे.