Protsahan Anudan : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. शेतकऱ्यांना वेळोवेळी कर्जमाफीचा देखील लाभ मिळत आहे. गेल्या दहा वर्षांच्या काळात शेतकऱ्यांना दोनदा कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. 2017 मध्ये आणि 2019 मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली आहे.
2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. यानंतर 2019 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले.
विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केले आहे त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा देखील निर्णय तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. पण, याची अंमलबजावणी महाविकास आघाडी सरकारला करता आली नाही.
याची अंमलबजावणी सुरू होण्याआधीच महाविकास आघाडी सरकार पायउतार झाले. यानंतर राज्यात शिंदे सरकार आले. शिंदे सरकारने सत्ता काबीज केल्यानंतर गेल्या महाविकास आघाडी सरकारचा नियमित कर्ज फेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान देण्याचा निर्णय कायम ठेवला.
यानुसार 2017-18, 2018 19 आणि 2019 20 या तीन वर्षांपैकी किमान दोन वर्ष नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन पर अनुदान देण्यात आले. मात्र शासनाच्या या निर्णयामुळे काही शेतकरी पात्र असूनही या योजनेपासून वंचित राहत होते.
राज्यातील काही शेतकऱ्यांनी या तीनपैकी एकाच वर्षात दोन हंगामांची पीक कर्जाची उचल करून परतफेड केली होती. त्यामुळे दोनदा कर्जाची परतफेड करूनही या योजनेच्या निकषामुळे शेतकरी योजनेपासून वंचित राहत होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल १४ हजार ४०० शेतकरी याच्या लाभापासून वंचित राहत होते. यामुळे संबंधित शेतकऱ्यांच्या माध्यमातून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे यासंदर्भात लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली. यावर पालकमंत्री मुश्रीफ यांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा सुरू केला.
दरम्यान पालकमंत्री मुश्रीफ यांचा पाठपुरावा यशस्वी झाला असून या योजनेपासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना आता याचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील अकरा हजार नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता प्रोत्साहन पर अनुदान मिळणार आहे.
खरेतर याबाबतचा निर्णय दोन महिन्यापूर्वी झाला होता. दोन महिन्यापूर्वीच यासाठी अनुदान मंजूर करण्यात आले होते. मात्र सहकार विभागाची उदासीनतेमुळे पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदानाचा लाभ मिळत नव्हता. आता मात्र जिल्ह्यातील 11000 शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान मिळणार आहे.
संबंधित शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान म्हणून तब्बल 46 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी या शेतकऱ्यांसाठी केलेला पाठपुरावा आता खऱ्या अर्थाने यशस्वी झाला आहे.