Property Rights : भारतात संपत्ती वरून मोठ्या प्रमाणात वाद विवाद होताना दिसतात. अनेकांना संपत्ती विषयक कायद्यांची फारशी माहिती नसते आणि यामुळे मोठ्या प्रमाणात वादविवाद होतात. अनेकदा कुटुंबांमध्ये होणारे संपत्तीबाबतचे वादविवाद बातचीत करून सुटत नाहीत, अशावेळी हे वाद विवाद कोर्टात जातात आणि कोर्टचं या प्रकरणावर निर्णय देते.
मालमत्तेशी संबंधित जे वाद होतात ते सहसा कायद्याची माहिती नसल्यानेच उद्भवतात. दरम्यान आज आपण मालमत्तेशी संबंधित अशाच एका बाबीची माहिती पाहणार आहोत. खरे तर अनेकांच्या माध्यमातून वडिलोपार्जित संपत्ती वारसांच्या संमतीशिवाय विकता येऊ शकते का असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
यामुळे आज आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कायद्यामध्ये वडिलोपार्जित संपत्तीच्या विक्री बाबत नेमके काय म्हटले आहे, याबाबत कायद्यात नेमक्या काय तरतुदी आहेत या संदर्भात आता आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
वडिलोपार्जित मालमत्ता वारसांच्या संमतीशिवाय विकता येते का?
सर्वप्रथम आपण वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे नेमकी कोणती मालमत्ता हे पाहूयात. मित्रांनो मालमत्तेचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. वडिलोपार्जित मालमत्ता आणि स्वअर्जीत किंवा स्व-अधिग्रहित मालमत्ता. यातील स्व अधिग्रहित मालमत्ता म्हणजे अशी मालमत्ता जी व्यक्तीने स्वत: खरेदी केली असते किंवा भेट, देणगी किंवा हक्क सोडून (जमिनीचा वाटा न घेणे) इत्यादी प्रकारातून व्यक्तीच्या नावावर होत असते.
दुसरी वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे अशी मालमत्ता जी वडिलांना पूर्वजांकडून मिळालेली असते. अशाप्रकारे संपादित केलेली जमीन वडिलोपार्जित संपत्ती मानली जाते. वडिलोपार्जित मालमत्ता विकण्याबाबतचे कायदे स्व-अधिग्रहित मालमत्तेपेक्षा थोडे कठोर असल्याची माहिती कायद्यातील तज्ञांनी दिलेली आहे.
तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार , जर वडिलोपार्जित संपत्ती विकायची असेल तर काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. कारण की अशा मालमत्तेवर कुटुंबाच्या चार पिढ्या दावा करू शकतात. त्यामुळे, अशा मालमत्तेची विक्री गुंतागुंतीची असते.
यामुळे अशी मालमत्ता खरेदी करणे आणि विक्री करणे दोन्हीही बाबी फारच अवघड आहेत. ही मालमत्ता विकण्याचा निर्णय घ्यायचा कोणत्याही एका व्यक्तीच्या वैयक्तिक संमतीच्या आधारे घेता येत नाही किंवा त्यांच्या आंशिक मालकांच्या निर्णयावर आधारे अशी मालमत्ता विकली जाऊ शकत नाही.
वडिलोपार्जित मालमत्ता विकण्यासाठी संबंधित प्रत्येक वारसदाराची (ज्यात मुलींचाही समावेश आहे) संमती आवश्यक आहे. जेव्हा सर्व पक्ष सहमत असतील तेव्हा कायदेशीर प्रक्रियेनुसार वडिलोपार्जित मालमत्ता विकली जाऊ शकते.
एकंदरीत वडीलोपार्जित मालमत्ता वारसांच्या संमतीशिवाय विकण्याचा विचार सुद्धा होऊ शकत नाही. जर एखाद्याने असे केले तर या संबंधित मालमत्तेच्या वारसदारांना अशा व्यवहाराविरोधात न्यायालयात दाद मागता येते.