Pomegranate Rate : सध्या संपूर्ण देशभर गणेशोत्सवाचा सण मोठ्या धामधूमित साजरा केला जात असून याच आनंदमयी वातावरणात शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंबाला किलोमागे 501 रुपयाचा भाव मिळाला आहे.
हा या हंगामातील सर्वाधिक दर ठरला आहे. खरे तर डाळिंब हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. या फळपिकाची नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर सहित मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये तसेच मराठवाड्यातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
नाशिक अन अहमदनगर जिल्हा तर डाळिंब उत्पादनात खूपच अग्रेसर आहे. येथील हवामान डाळिंब पिकासाठी विशेष पूरक आहे. नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा म्हणजेच कसमादेपट्टा डाळिंब उत्पादनासाठी संपूर्ण देशात ओळखला जातो.
या पट्ट्यात दरवर्षी डाळिंब खरेदीसाठी बाहेरील राज्यातील व्यापारी गर्दी करत असतात. अहमदनगर आणि पुण्यातही अशीच परिस्थिती पाहायला मिळते.
दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुक्यातील पोखर्डी येथील प्रयोगशील शेतकरी अक्षय संजय कराळे यांच्या डाळिंबाला पुण्याच्या बाजारात सर्वाधिक 501 रुपये प्रति किलो असा विक्रमी दर मिळाला आहे. 9 सप्टेंबर रोजी झालेल्या लिलावात हा विक्रमी भाव मिळाला आहे.
अक्षय यांनी सांगितल्याप्रमाणे ते गेल्या दहा-बारा वर्षांपासून डाळिंबाची शेती करत आहेत. त्यांनी दहा एकर जमिनीत तब्बल साडेतीन हजार डाळिंबाच्या रोपांची लागवड केली आहे. त्यातून त्यांना वर्षाला शंभर ते सव्वाशे टन एवढे डाळिंबाचे उत्पादन मिळते.
यंदाही त्यांना जवळपास सव्वाशे टन एवढे डाळिंबाचे उत्पादन मिळणार असून यातून त्यांना दोन कोटी रुपयांची कमाई होईल अशी आशा आहे. दरम्यान, अक्षय यांनी नऊ तारखेला पुण्याच्या बाजारात आपला डाळिंब विक्रीसाठी आणला होता.
त्यांनी तब्बल दोन टन डाळिंब विक्रीसाठी आणले होते. यात ३५० ते ४०० ग्रॅमच्या डाळिंबाला ३९० रुपये, ४०० ते ४२० ग्रॅमच्या डाळिंबाला ४३० रुपये, ५०० ते ५५० ग्रॅमच्या डाळिंबाला ५०१ रुपये प्रतिकिलोचा भाव मिळाला आहे.
या हंगामातील सर्वाधिक दर अक्षय यांच्या डाळिंबाला मिळाला असल्याने बाजार समिती प्रशासनाच्या माध्यमातून त्यांचा सत्कार देखील करण्यात आला हे विशेष.
नक्कीच शेतीमध्ये जर वेगवेगळे प्रयोग केलेत, आधुनिक पद्धतीने शेती केली तर शेतीमधूनही लाखो, करोडोंची उलाढाल करता येणे शक्य असल्याचे अक्षय यांनी आपल्या प्रयोगातून पुन्हा एकदा जगाला दाखवून दिले आहे.