Pomegranate Rate : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या मुद्द्यावरून घमासान सुरु आहे. शेतकरी संघटना आणि व्यापारी कांद्याच्या मुद्द्यावर चांगलेच आक्रमक बनले आहेत. विशेषता गेल्या महिन्यात केंद्र शासनाने कांदा निर्यातीसाठी 40% शुल्क आकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील शेतकरी व्यापारी आणि शेतकरी संघटना शासनाविरोधात आवाज बुलंद करत आहेत.
नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपूर्वी बेमुदत काळासाठी कांदा लिलाव बंद करण्याचे जाहीर केले होते. त्यावेळी केंद्रीय मंत्री भारतीय पवार यांनी मध्यस्थी करून कांद्याचे लिलाव पुन्हा सुरू केले होते. मात्र गेल्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी पुन्हा एकदा बेमुदत काळासाठी लिलाव बंद करण्याचे जाहीर केले आहे.
गेल्या आठवड्यापासून कांद्याचे लिलाव नाशिक जिल्ह्यात बंद आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. खरंतर केंद्र शासनाने निर्यात शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून बाजारभावात घसरून देखील पाहायला मिळाली आहे. पण राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना सध्या मोठा दिलासा मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून डाळिंबाच्या बाजारभावात सातत्याने वाढ होत आहे.
डाळिंबाला कधी नव्हे तो विक्रमी भाव मिळू लागला आहे. यामुळे सध्या राज्यभर डाळिंबाच्या बाजारभावाची चर्चा पाहायला मिळत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहता एपीएमसी मध्ये डाळिंबाला तब्बल आठशे रुपये प्रति किलोचा भाव मिळाला आहे. इतिहासात पहिल्यांदाच डाळिंबाला एवढा भाव मिळाला असल्याचा दावा केला जात आहे. यामुळे राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठे समाधान पाहायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील युवा शेतकरी रमेश गाडेकर यांच्या डाळिंबाला हा भाव मिळाला आहे. नारायणगाव येथील शेतकरी रमेश गाडेकर यांनी बुधवारी सकाळी राहता एपीएमसी मध्ये डाळिंब विक्रीसाठी आणले होते. त्यांनी विक्रीसाठी आणलेल्या भगवा व्हरायटीच्या उच्च दर्जाच्या मालाला लिलावात हमाली, तोलाई आणि इतर खर्च वजा जाता तब्बल आठशे रुपये प्रति किलो एवढा भाव मिळाला आहे.
गाडेकर यांच्या या उच्च प्रतीच्या 26 किलो मालासाठी तब्बल 16 हजार रुपये मिळाले आहेत. यामुळे गाडेकर यांनी यावेळी समाधान व्यक्त केले आहे. त्यांचे डाळिंब 400 ते 800 ग्राम वजनाचे होते. डाळिंबाची क्वालिटी खूपच उत्तम होती. हेच कारण आहे की त्यांच्या डाळिंबाला विक्रमी भाव मिळाला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.