Pomegranate Rate : डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर येत आहे. ती म्हणजे डाळिंबाचे बाजार भाव गेल्या काही दिवसांपासून सातत्याने नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहेत.
डाळिंबाला सध्या कधी नव्हे तो ऐतिहासिक दर मिळत आहे. यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी बांधव मोठे समाधानी असल्याचे चित्र आहे. खरंतर राज्यात डाळिंब या फळ पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे.
डाळिंबाची लागवड राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळते. कांद्यानंतर डाळिंबाचे आपल्या राज्यात सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. डाळिंब या फळ पिकांवर राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे.
यंदा मात्र डाळिंब पिकाने शेतकऱ्यांना चांगलीच साथ दिली आहे. डाळिंबाचे बाजार भाव तेजीत असून आज पुण्यातील एका मार्केटमध्ये डाळिंबाला तब्बल 725 रुपये प्रति किलोचा भाव मिळाला आहे.
आपणास ठाऊकच असेल की, नुकत्याच काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी जवळील राहता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंबाला आठशे रुपये प्रति किलोचा भाव मिळाला होता.
त्यावेळी राहता एपीएमसी मध्ये पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मालाला हा भाव मिळाला होता. अशातच आता अहमदनगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या डाळिंबाच्या मालाला पुणे जिल्ह्यातील जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत येणाऱ्या आळेफाटा उपबाजार 20 किलोच्या कॅरेटला तब्बल 14,500 रुपयांचा भाव मिळाला आहे.
अर्थातच प्रति किलो 725 रुपये एवढा विक्रमी भाव सदर मालाला मिळाला आहे. यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी बांधव सध्या मोठे आनंदी आहेत. यंदा डाळिंबाच्या पिकाने शेतकऱ्यांना मालामाल करून सोडले आहे.
आळेफाटा उपबाजार प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 29 सप्टेंबर 2023 अर्थातच शुक्रवारी बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावात अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील शेतकरी विवेक अविनाश रायकर यांच्या डाळींबाला हा विक्रमी भाव मिळाला आहे.
प्रयोगशील शेतकरी रायकर यांनी उत्पादित केलेल्या चांगल्या दर्जाच्या डाळिंबच्या वीस किलोच्या एका क्रेटला तब्बल १४ हजार ५०० रुपयांचा भाव मिळाला आहे. विशेष म्हणजे या युवा शेतकऱ्याच्या दुसऱ्या डाळिंबाच्या एका क्रेटला ११ हजार, 3 नंबरच्या क्रेटला १० हजार, चार नंबरच्या कॅरेटला ६ हजार रुपये व पाच नंबरच्या एका क्रेटला ४ हजार रुपये असा भाव मिळाला.
यामुळे रायकर भलतेच खुश झालेत. खरंतर आळेफाटा मार्केट फळ लिलावासाठी विशेष प्रसिद्ध आहे मात्र यंदा डाळिंबाला मार्केटमध्ये चांगला विक्रमी दर मिळत असल्याने सध्या आळेफाटा मार्केटची संपूर्ण राज्यात चर्चा पाहायला मिळत आहे.