Pomegranate New Variety : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेत भारतीय कृषी संशोधन संस्थेअंतर्गत देशभरात कार्यरत विविध संशोधन संस्थांनी विकसित केलेली विविध फळे आणि पिकांची १०९ वाणे प्रसारित करणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीला आगामी काळात चालना मिळणार आहे.
विविध पिकांचे शेकडो वाण आता शेतकऱ्यांना उपलब्ध होणार असल्याने त्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढणार आहे. विशेष म्हणजे या वाणामध्ये डाळिंबाच्या एका वाणाचा देखील समावेश आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पश्चिम महाराष्ट्रातील सोलापुरातील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राने संशोधित केलेल्या डाळिंबाच्या नव्या ‘सोलापूर अनारदाना’ या वाणाचा देखील यामध्ये समावेश आहे.
अर्थातच डाळिंबाची ही नव्याने विकसित झालेली जात आता शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण डाळिंबाच्या या नव्याने विकसित झालेल्या सुधारित जातीची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
डाळिंबाच्या नव्याने विकसित झालेल्या जातीच्या विशेषता
डाळिंब हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे फळ पिक आहे. याची शेती राज्यातील मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक पाहायला मिळते. मराठवाड्यात देखील डाळिंबाची लागवड केली जाते. नाशिक, सोलापूर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये डाळिंबाचे सर्वाधिक लागवड पाहायला मिळते.
नाशिक जिल्हा बाबत बोलायचं झालं तर जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा अर्थातच कसमादेपट्टा हा डाळिंब उत्पादनासाठी संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. दरवर्षी या भागात डाळिंब खरेदीसाठी उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, दिल्ली यांसारख्या राज्यातील व्यापारी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात.
सोलापूर मध्ये देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळते. दरम्यान आता राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी सोलापूर अनारदाना हे डाळिंबाचे नवीन वाण तयार झाले आहे. या वाणाची विशेषता म्हणजे यापासून अनारदाना तयार करता येणार आहे.
डाळिंब प्रक्रियेसाठी या जातीची शिफारस करण्यात आली आहे. यापासून उच्च दर्जाचा अनारदाणा तयार करता येणार आहे. अनारदाना म्हणजेच डाळिंबाचे सुके बी नेहमीच बाजारात मागणीमध्ये असते.
मात्र आतापर्यंत अनारदाना तयार करण्यासाठी विशिष्ट वाण बाजारात नव्हते. मात्र आज प्रसारित होणारे हे वाण बाजारात दाखल झाल्यानंतर याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या जातीच्या डाळिंबात मऊ बिया असतात.
यात गडद लाल दाणे असतात. तसेच यात अधिकचा रस आढळून येतो. याची फळे मध्यम ते मोठ्या आकाराची असतात. या जातीच्या फळांचे वजन हे एवरेज तीनशे ग्रॅम दरम्यान असते. या जातीपासून दरवर्षी सरासरी 18 ते 20 किलो प्रति झाड प्रमाणे उत्पादन मिळू शकते असा दावा तज्ञांनी केला आहे.
या दाण्यांचा स्वाद गोड-आंबट असल्याचे आढळून आले आहे. याचे सेवन हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तसेच हे डाळिंब अनारदाना प्रक्रियेसाठी उपयुक्त ठरणार आहे. यामुळे याची लागवड शेतकऱ्यांना अधिकचे उत्पन्न मिळवून देणार अशी आशा आहे.