Pomegranate Farming : राज्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे डाळिंब बाजारभावात सुधारणा झाली आहे. खरे तर, डाळिंब या फळ पिकाची राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये लागवड केली जाते. नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यात तर डाळिंबाची लागवड विशेष उल्लेखनीय आहे.
नाशिक जिल्ह्यातील कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा म्हणजेच कसमादे पट्ट्यात डाळिंबाची मोठ्या प्रमाणात लागवड होते. विशेषतः मालेगाव तालुक्यातील डाळिंब लागवड अधिक पाहायला मिळते. सोलापूर जिल्ह्यातही विविध तालुक्यांमध्ये डाळिंबाची लागवड होते.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातूनच डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंबाला विक्रमी दर मिळाला आहे.
25 जुलै रोजी झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये डाळिंबाला तब्बल तीनशे रुपये प्रति किलो असा भाव मिळाला आहे. मोहन शंकर माळी फ्रुट कंपनी या आडत दुकानात तालुक्यातील मौजे सलगर येथील डाळिंब उत्पादक शेतकरी गणपत तेली यांच्या मालाला हा विक्रमी दर मिळाला.
निर्यातक्षम डाळींबा पेक्षा अधिकचा भाव मिळाल्याने तेली यांच्या चेहऱ्यावर कमालीचे समाधान पाहायला मिळाले. त्यांनी चक्क पेढे वाटून आपला हा आनंद साजरा केला. व्यापारी आप्पासो पालवे यांनी या डाळिंबाची खरेदी केली.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमान सुशील अवताडे यांनी संबंधित शेतकरी, व्यापारी अन आडत मालक यांचा सत्कार केला. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, मंगळवेढा एपीएमसी मध्ये दररोज डाळिंबाचे लिलाव होतात.
दररोज चार वाजता या एपीएमसी मध्ये डाळिंबाचे सौदे लिलाव पार पडत असतात. विशेष म्हणजे येथे शेतकऱ्यांचा माल विक्री झाल्यानंतर तात्काळ त्यांना पैसे मिळतात. रोख कॅश किंवा ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांना पैसे मिळतात.
यामुळे तालुक्यासहित आजूबाजूच्या तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी देखील या बाजारात डाळिंब विक्रीसाठी नेहमीच गर्दी करतात. सोलापूर, पंढरपूर, सांगोला, जत, मोहोळ येथील शेतकरी डाळिंब विक्रीसाठी येतात सोबतच कर्नाटक राज्यातील शेतकरी देखील मंगळवेढा एपीएमसी मध्ये आपला डाळिंब विक्रीसाठी आणतात हे विशेष.
तसेच या बाजारात डाळिंब खरेदी करून येथील व्यापारी हा माल गुजरात, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली यांसारख्या राज्यांमध्ये विक्रीसाठी पाठवत असतात.
हेच कारण आहे की या बाजारात डाळिंबाला चांगला विक्रमी दर मिळतो. दोन दिवसांपूर्वी झालेल्या लिलावात देखील डाळिंबाला येथे विक्रमी भाव मिळाला असून यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा समाधान पाहायला मिळतय.