PM Suryoday Yojana : 22 जानेवारी 2024 ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीक्षेत्र अयोध्या येथे प्रभू श्री रामरायाच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली. त्यादिवशी अयोध्या येथील भव्य राम मंदिर सर्वसामान्य राम भक्तांसाठी सुरू करण्यात आले. विशेष म्हणजे त्यादिवशी पार पडलेल्या ऐतिहासिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम सूर्योदय योजनेची देखील घोषणा केली.
त्यांनी या योजनेअंतर्गत एक कोटी घरांवर सोलर बसवले जाईल असे जाहीर केले होते. यानंतर एक फेब्रुवारी 2024 ला सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन जी यांनी देखील या योजनेबाबत माहिती दिली होती. दरम्यान आता याच योजनेबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची अपडेट समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पीएम सूर्योदय योजनेसाठी नवीन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. pmsuryagarh.gov.in हे नवीन पोर्टल केंद्र शासनाने नुकतेच सुरू केले आहे. दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत एक्स हॅन्डलवरुन याची माहिती नागरिकांना दिली आहे. अशा परिस्थितीत आता आपण या पोर्टलवर इच्छुकांना कशा पद्धतीने अर्ज सादर करता येऊ शकतो याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काय आहे योजना ?
पीएम सूर्योदय योजना ही अलीकडेच सुरू झालेली योजना आहे. या अंतर्गत घरावर सोलर बसवण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. याचा लाभ देशातील एक कोटी कुटुंबांना देण्याचा निर्धार शासनाने केला आहे. यासाठी 75 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती शासनाने दिली आहे. या योजनेअंतर्गत घरावर सोलर पॅनल बसवले जाणार असून या सोलर पॅनलच्या माध्यमातून 300 युनिट पर्यंतची वीज सर्वसामान्यांना मोफत मिळणार आहे. पीएम सूर्योदय योजनेअंतर्गत जे सोलर पॅनल बसवले जातील त्यावर सरकारकडून 60 टक्क्याचे अनुदान मिळणार आहे.
किती अनुदान मिळणार ?
ज्यांना 2 KW पर्यंत क्षमता असलेले सोलर पॅनल बसवायचे असतील त्यांना प्रती KW तीस हजार रुपयाचे अनुदान म्हणजेच 2KW साठी 60000 रुपयाचे अनुदान मिळणार आहे. जें 2KW पेक्षा अधिक आणि 3 KW पर्यंत क्षमता असलेले सोलर पॅनल बसवतील त्यांना 2KW साठी 60 हजार आणि मग नंतर प्रती KW 18 हजार रुपयाचे अनुदान मिळणार आहे. म्हणजेच जर एखाद्याने 3 KW चे सोलर पॅनल बसवले तर त्याला 78 हजार रुपयाचे अनुदान मिळणार आहे. 3KW पेक्षा अधिक क्षमतेचे पॅनल बसवणाऱ्यांना देखील फक्त 78000 रुपयांचेच अनुदान मिळणार आहे.
अर्ज कसा करणार ?
https://pmsuryaghar.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यायची आहे. शासनाने नुकत्याच सुरू केलेल्या या पोर्टलवर भेट दिल्यानंतर तुम्हाला यासाठी अर्ज करायचा आहे. यासाठी अप्लाय फॉर रूफ-टॉप सोलर या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
नंतर तुम्हाला येथे नोंदणी अर्थातच रजिस्ट्रेशन पूर्ण करावे लागणार आहे. यासाठी तुम्हाला तुमचे राज्य, वीज कंपनी इत्यादी माहिती भरावी लागेल. संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होणार आहे. येथे तुम्हाला तुमचा वीज ग्राहक क्रमांक मोबाईल नंबर आणि ईमेल देखील द्यावा लागेल.
एकदा रजिस्ट्रेशन पूर्ण झाले की मग तुम्हाला या पोर्टल वर पुन्हा एकदा लॉगिन घ्यावे लागणार आहे. पोर्टलवर लोगिन केल्यानंतर तुम्हाला अप्लाय फॉर रूफटॉप सोलर यावर क्लिक करून अर्ज भरा आणि प्रोसीड या बटनावर क्लिक करायचे आहे.
अर्ज सादर झाल्यानंतर मग Discom कडून व्यवहार्यता मंजुरी दिली जाईल. जर तुम्हाला ही मंजुरी मिळाली तर तुम्ही कोणत्याही नोंदणीकृत विक्रेत्याकडून सोलर पॅनल इंस्टॉल करू शकता.
सोलर पॅनल इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला प्लांट डिटेल सबमिट करून नेट मीटर साठी अर्ज करावा लागतो. नेट मीटरची स्थापना झाली की मग डिस्कॉमद्वारे पडताळणी पूर्ण होणार आणि पोर्टलवरून एक कमिशनिंग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
मग तुम्हाला पोर्टलद्वारे बँक खात्याचे तपशील आणि रद्द केलेला चेक सबमिट करावा लागणार आहे. यानंतर, मग सबसिडी तुमच्या बँक खात्यात 30 दिवसांच्या आत प्राप्त होणार आहे.