Pm Surya Ghar Mofat Vij Yojana : केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीआधी पीएम सूर्योदय योजनेची घोषणा केली होती. या योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारीला केली. 22 जानेवारी 2024 या दिवशी श्रीक्षेत्र अयोध्या येथील राम मंदिराचे उद्घाटन झाले आणि उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर दिल्लीला गेल्यावर लगेचच पीएम मोदी यांनी या महत्वकांक्षी योजनेची घोषणा केली.
पुढे ही योजना मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आली आणि या योजनेला पीएम सूर्य घर मोफत वीज योजना असे नाव देण्यात आले. पुढे या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. या योजनेंतर्गत 300 युनिट मोफत विजेचा लाभ दिला जाणार आहे.
यासाठी सरकारकडून देशभरातील एक कोटी कुटुंबांना सोलर पॅनल साठी अनुदान दिले जाणार आहे. कोणताही भारतीय नागरिक याचा लाभ घेऊ शकतो. तथापि, अर्जदाराच्या घराच्या छतावर सौर पॅनेल बसविण्यासाठी पुरेशी जागा असणे आवश्यक आहे. सरकार पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेंतर्गत सोलर पॅनल बसवण्यासाठी तब्बल 78 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान देत आहे.
या अंतर्गत एक किलो वॅटचे सोलर पॅनल बसवण्यासाठी 30 हजार, दोन किलो व्हॅटचे सोलर पॅनल बसवण्यासाठी 60 हजार आणि तीन किलो वॅटचे सोलर पॅनल बसवण्यासाठी 78 हजाराचे अनुदान मिळणार आहे. पण या अनुदानाचा लाभ मिळण्यापूर्वी अर्जदाराने सोलर पॅनल बसवणे आवश्यक आहे.
सोलर रुफटॉप बसवण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. म्हणजे तुम्हाला तुमच्या खिशातून हजारो रुपये खर्च करावे लागणार आहेत. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल आणि तुमच्याकडे सोलर पॅनल बसवण्यासाठी पैसे नसतील तर तुम्हाला आता एसबीआय मदत करणार आहे.
एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया तुम्हाला सोलर पॅनल बसवण्यासाठी कर्ज स्वरूपात मदत करणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण एसबीआय सोलर पॅनल बसवण्यासाठी किती कर्ज देते, यासाठी व्याजदर काय आहे? याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
SBI किती कर्ज देणार?
मिळालेल्या माहितीनुसार पब्लिक सेक्टर मधील सर्वात मोठी बँक एसबीआय 3KW क्षमतेचे सोलर रूफटॉप बसवण्यासाठी 2,00,000 रुपयांपर्यंत कर्ज देत आहे. तसेच 3KW पेक्षा जास्त आणि 10KW पर्यंतच्या क्षमतेसाठी 6 लाख रुपयांपर्यंत कर्ज देत आहे.
व्याजदर कसे आहेत?
एसबीआय कडून दोन किलो वॅटपर्यंतचे सोलर पॅनल बसवण्यासाठी 7 टक्के व्याजदराने दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. तसेच तीन किलो वॅट पेक्षा जास्त आणि दहा किलो वॅट पर्यंतच्या क्षमतेचे सोलर पॅनल बसवण्यासाठी सहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज 10.15% या व्याजदराने दिले जात आहे. यासाठी कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही हे विशेष.
अट काय आहे?
एसबीआयने 3 kW क्षमतेपर्यंत सोलर रूफ टॉप बसवण्यासाठी उत्पन्नाचे कोणतेही निकष लावलेले नाहीत. परंतु 3 kW पेक्षा जास्त आणि 10 kW पर्यंतच्या क्षमतेसाठी कर्ज मिळविण्यासाठी वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपये किंवा त्याहून अधिक असणे आवश्यक राहणार आहे.