Pm Surya Ghar Free Electricity Yojana : केंद्र शासनाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार देशात पीएम सूर्य घर मोफत योजना राबवण्याचे जाहीर करण्यात आले आहे. या योजनेला मोदी कॅबिनेटने नुकतीच मंजुरी दिली असून तेव्हापासून ही योजना संपूर्ण देशात चर्चेचा विषय ठरली आहे.
या योजनेच्या पार्श्वभूमी बाबत बोलायचं झालं तर याची घोषणा सर्वप्रथम 22 जानेवारी 2024 ला झालेल्या ऐतिहासिक राम मंदिर उद्घाटनाच्या दिवशी करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील भव्य राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाल्यानंतर या योजनेची घोषणा केली होती.
त्यांनी अभिषेक समारंभातून परतल्यानंतर 1 कोटी घरांसाठी या नवीन रूफटॉप सोलर योजनेची घोषणा केली. त्यांनी त्यावेळी या योजनेला पीएम सूर्योदय योजना असे नाव दिले होते.
त्यानंतर लगेचच, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्पात सांगितले की नवीन योजनेअंतर्गत सौर पॅनेल वितळवून दरवर्षी 15,000-18,000 रुपये वाचवले जाऊ शकतात. 13 फेब्रुवारी रोजी पीएम मोदींनी नवीन रूफटॉप सौर योजनेचे नाव बदलून ‘पीएम सूर्य घर: मोफत वीज योजना’ असे केले.
ते म्हणाले की 75,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक असलेल्या या उपक्रमामुळे देशभरातील एक कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध होईल.खरे तर देशात सोलर पॅनल बसवण्यासाठी आधी देखील अनुदान दिले जात होते. यासाठी सोलर रूप स्टॉप योजना राबवली जात होती.
यामुळे अनेकांच्या माध्यमातून जुन्या सोलर रुफ टॉप योजनेपेक्षा नवीन योजनेत म्हणजेच पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत अधिक सबसिडी मिळते का? हा सवाल उपस्थित केला जात होता. दरम्यान आता आपण याच प्रश्नाचे उत्तर अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जुन्या योजनेपेक्षा अधिक सबसिडी मिळते का
मिळालेल्या माहितीनुसार केंद्रातील मोदी सरकारने पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेंतर्गत आधीच्या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानापेक्षा अधिक अनुदान दिले जात आहे. नवीन योजनेच्या अनुदानात पूर्वीच्या रूफटॉप सोलर योजनेच्या तुलनेत किमान ६७ टक्के वाढ केली आहे.
MNRE च्या आकडेवारीनुसार, पूर्वीच्या रूफटॉप योजनेंतर्गत 3 kW पर्यंत प्रति किलोवॅट 18000 रुपये अनुदान दिले जात होते. तर 4 kW ते 10 kW प्रति किलोवॅट 9000 रुपये अनुदान दिले जात होते.
नवीन योजनेंतर्गत, 1-किलोवॅट रूफटॉप सोलर सिस्टीम बसविणाऱ्या प्रत्येकासाठी किमान अनुदान 30,000 रुपये राहणार आहे. पूर्वीच्या योजनेअंतर्गत मात्र 18,000 रुपय एवढेच अनुदान दिले जात होते. 2-kW प्रणाली बसवणाऱ्यांसाठी आता 60,000 रुपये अनुदान मिळणार आहे. आधी हे अनुदान फक्त 36000 एवढे होते.
3 किलोवॅट रुफटॉप सोलर सिस्टीम बसविणाऱ्या कुटुंबांना जुन्या योजनेअंतर्गत 54,000 रुपय एवढे अनुदान दिले जात असे आता मात्र 3 किलोवॅट रुफटॉप सोलर सिस्टीम बसवण्यासाठी या नवीन योजनेअंतर्गत 78,000 रुपये एवढे अनुदान मिळणार आहे. पण, नवीन योजनेत, 3 kW पेक्षा मोठ्या प्रणालींसाठी एकूण अनुदान 78,000 रुपये एवढेच निश्चित करण्यात आले आहे.