Pm Mudra Loan Yojana : केंद्रातील आणि राज्यातील सरकार सर्वसामान्य गरजवंत नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असते. 2014 मध्ये केंद्रात सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने देखील सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत. देशातील सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना व्यवसाय सुरू करता यावा यासाठीही केंद्रातील भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीए आघाडी सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे.
पंतप्रधान मुद्रा योजना असे या योजनेचे नाव आहे. या योजनेअंतर्गत तरुणांना व्यवसायासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाते. ही आर्थिक मदत तरुणांना कर्ज स्वरूपात मिळत असून यामुळे व्यवसाय करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. आतापर्यंत या योजनेचा लाभ देशभरातील करोडो नागरिकांनी घेतला असून आता याच योजने संदर्भात केंद्रातील सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रातील मोदी सरकारने या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जाची मर्यादा वाढवली आहे. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 50,000 पासून ते दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून दिले जात होते.
पण आता या योजनेच्या माध्यमातून व्यवसायासाठी तब्बल वीस लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामुळे नक्कीच व्यवसायिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या योजनेसाठीच्या पात्रता आणि यासाठी कुठे अर्ज करावा लागणार याविषयी माहिती पाहणार आहोत.
पीएम मुद्रा योजनेचा लाभ कोणाला मिळणार?
तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत पुरवण्याच्या उद्देशाने पीएम मुद्रा योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून आता व्यावसायिकांना तब्बल वीस लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामजी यांनी अर्थसंकल्प 2024-25 मध्ये याबाबतची घोषणा केली आहे.
या योजनेचा लाभ फक्त भारतातील नागरिकांना मिळणार आहे. अठरा वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकांना याचा लाभ मिळणार आहे. ज्या लोकांना बँकेने डिफॉल्टर म्हणून घोषित केले आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. याचा लाभ फक्त व्यवसायिकांना मिळणार आहे.
यामुळे व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि व्यवसाय वाढवण्यासाठी मदत होणार आहे. यासाठी अर्ज करतांना आधार कार्ड, वोटर आयडी, रेशन कार्ड, पॅन कार्ड, जात प्रमाणपत्र, व्यवसाय संबंधित सर्टिफिकेट असे महत्वाचे कागदपत्र अर्जदाराला सादर करावे लागतात.
अर्ज कुठं करावा लागणार ?
जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळील बँकेत जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता. देशातील कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत या योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करून दिले जाते. या अंतर्गत आता वीस लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. या कर्जासाठी दहा ते बारा टक्के एवढे व्याजदर आकारले जाते.
20 लाखाचे कर्ज कोणाला मिळणार ?
पीएम मुद्रा योजनेअंतर्गत शिशु, किशोर अन तरुण अशा तीन कॅटेगिरी मधून कर्ज मिळते. शिशु कॅटेगिरी मधून 50,000 पर्यंतचे कर्ज मिळते. किशोर कॅटेगिरी मधून 50,000 पासून ते 5 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. तरुण कॅटेगिरी मधून 50 हजारापासून ते दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते.
आता, मात्र या अंतर्गत वीस लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे. परंतु यासाठी आधी घेतलेले कर्ज फेडलेले असणे आवश्यक आहे. ज्या लोकांनी पीएम मुद्रा योजनेअंतर्गत आधीच कर्ज घेतलेले असेल आणि त्या कर्जाची परतफेड केलेली असेल अशाच लोकांना आता या योजनेअंतर्गत वीस लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे.