Pm Kusum Yojana : केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जोपासण्याचा प्रामाणिक प्रयत्न सरकार करत असते. पीएम कुसुम योजना ही देखील अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना आहे.
या योजनेअंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना अनुदानावर सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जात आहेत. यासाठी शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाच्या क्षमतेनुसार अनुदान पुरवले जात आहे.
यामुळे ही योजना राज्यासहित संपूर्ण देशातील शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरली आहे. यामुळे शेतकऱ्यांची विजेसाठीची होणारी धडपड निकाली निघत आहे.या योजनेअंतर्गत सौर कृषी पंप बसवून शेतकऱ्यांना विजेच्या समस्यावर तोडगा काढता येत आहे.
विशेष म्हणजे शासन देखील या योजनेचा शेतकऱ्यांनी अधिकाअधिक लाभ घ्यावा यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र याच शासनाच्या महत्त्वकांक्षी योजनेच्या आडून काही ठग शेतकऱ्यांची लुबाडणूक करत असल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.
पीएम कुसुम योजनेच्या नावाने काही बनावट संकेतस्थळ तयार झालेले आहेत. या संकेतस्थळावरून अर्थातच वेबसाईटवरून भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचे उघडकीस आले आहे.
यामुळे शेतकऱ्यांनी पीएम कुसुम योजनेच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या अशा बनावट संकेतस्थळापासून सावध राहावे आणि या बनावट संकेतस्थळावर चुकूनही भेट देऊ नये तसेच पैशांचा भरणा करू नये असे आवाहन जाणकार लोकांचा माध्यमातून करण्यात आले आहे.
दरम्यान आता आपण पीएम कुसुम योजनेच्या नावाने सुरू झालेल्या काही बनावट वेबसाईटची माहिती जाणून घेणार आहोत तसेच बनावट वेबसाईट कशी ओळखायची हे देखील थोडक्यात पाहणार आहोत.
बनावट वेबसाईटची यादी
पीएम कुसुम योजनेच्या बनावट वेबसाईट .Org, .In, .Com अशा बनावट डोमेनने चालवल्या जात आहेत. www.kusumyojanaonline.in.net, www.pmkisankusumyojana.co.in, www.onlinekusumyojana.org.in, www.pmkusumyojana.com या पीएम कुसुम योजनेच्या काही बनावट वेबसाईट आढळल्या आहेत.
विशेष म्हणजे आम्ही फक्त उदाहरण म्हणून या बनावट वेबसाईटची माहिती दिलेली आहे. अशा अनेक बनावट वेबसाईट आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांची सर्रासपणे लूट होत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी चुकूनही अशा बनावट वेबसाईटवर जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.
पीएम कुसुम योजनेची अधिकृत वेबसाईट कोणती
राज्यात पीएम कुसुम योजना ही महाऊर्जाच्या माध्यमातून राबवली जात आहे. यामुळे या योजनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्थातच www.mahaurja.com या संकेतस्थळावर भेट द्यावी असे आवाहन जाणकारांनी केले आहे. शिवाय, ०२०-३५०००४५० या क्रमांकावर संपर्क साधून देखील शेतकरी बांधव या योजनेची अधिक माहिती जाणून घेऊ शकतात.