Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाने सुरू केलेली एक महत्वाकांक्षी शेतकरी हिताची योजना आहे. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली होती. तेव्हापासून ही योजना अविरतपणे सुरू आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जात आहेत.
दोन हजार रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या पैशांचे वाटप केले जाते. ही योजना शेतकऱ्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना 15 हप्ते प्राप्त झाले आहे.
म्हणजे या योजनेच्या पात्र शेतकऱ्याला आतापर्यंत तीस हजाराची मदत मिळाली आहे. या योजनेचा मागील 15 वा हप्ता हा 15 नोव्हेंबर 2023 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला होता.
यामुळे या योजनेचा सोळावा हप्ता केव्हा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार हा प्रश्न केला काही दिवसांपासून उपस्थित केला जातोय. आता मात्र शेतकऱ्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या योजनेचा सोळावा हप्ता 28 फेब्रुवारी 2024 रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहेत. विशेष म्हणजे पीएम किसानचा सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा हप्ता देखील सोबतच शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.
अर्थातच महाराष्ट्रातील पीएम किसान योजनेचा लाभार्थ्यांना पीएम किसानचे 2000 आणि नमो शेतकरीचे चार हजार असे एकूण सहा हजार रुपये एकमुस्त मिळणार आहेत.
खरेतर, येत्या काही दिवसात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. यासाठी मार्चच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागू होईल अशी शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आणि राज्य शासनाने पीएम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे ठरवले आहे. मात्र, या योजनेचा लाभ हा काही शेतकऱ्यांना मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
कोणाला मिळणार नाही लाभ ?
मिळालेल्या माहितीनुसार पीएम किसानच्या 16 व्या हप्त्याचा आणि नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याचा लाभ घेण्यासाठी, जमिनीची कागदपत्रे अपलोड करणे, सक्रिय बँक खात्याशी आधार लिंक करणे आणि ई-केवायसी करणे आवश्यक राहणार आहे.
यामुळे ज्या शेतकऱ्यांनी हे काम केलेले नाही त्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जाणार नाही.